पवना धरण 50 टक्के भरले !

0

मावळातील वडिवळे धरणात 73.51 टक्के, आंद्रा धरणात 69.34 टक्के तर कासारसाई धरणात 58.41 टक्के पाणीसाठा

संततधार पावसाने पवना व इंद्रायणी वहात आहेत दुथडी भरून

लोणावळा : मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मावळ तालुक्यातील पवना धरणात 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर मावळातील वडिवळे धरणात 73.51 टक्के, आंद्रा धरणात 69.34 टक्के, कासारसाई धरणात 58.41 टक्के पाणीसाठा झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. पावसाळा सुरू होऊनही चांगला पाऊस न झाल्याने पिंपरी-चिंचवड परिसरातील आणि मावळ तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांना पाणी कपातीची भिती वाटत होती. अनेक ठिकाणी पाणी कमी पुरवठा होत होता. त्यामुळे आता ती भिती राहिली नाही. गेल्या काही दिवसांच्या सतत पडणार्‍या पावसाने धरणामध्ये पाणीसाठा वाढला आहे. शहर परिसराबरोबरच धरण परिसरात चांगला पाऊस होत असल्याने आता पवना धरणामध्ये पाणी वाढले आहे.

मागील 24 तासात 149 मिमी
मागील आठवडाभरापासून पिंपरी-चिंचवड महापालिका परिसर, ग्रामीण भाग व मावळ परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मागील 24 तासात पवना धरण परिसरात 149 मिमी तर लोणावळा शहरात 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या संततधारेमुळे मावळ भागातील इंद्रायणी व पवना या दोन्ही नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. मागील आठवड्यात सांगिसे पूल पाण्याखाली जाण्याची घटना व जलपर्णीमुळे इंद्रायणीला वाकसई भागात पूर आल्याच्या घटना घडल्या होत्या. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील काही दिवसात मावळातील धरणे तुडुंब होण्याची शक्यता आहे. पावसाच्या सोबत वारा असल्याने लोणावळा व परिसरासह मावळात अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरु आहे.

पावसाने सरासरी ओलांडली
जून महिना संपला तरी सुरु न झालेला मान्सून जुलै महिन्यात लोणावळ्यात चांगलाच सक्रिय झाला आहे. अवघ्या पंधरा दिवसात पावसाने मागील वर्षीची सरासरी गाठली आहे. लोणावळा शहरात आज अखेर 1810 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आज अखेर हा आकडा 1765 मिमी होता. सतत पडणार्‍या पावसाने लोणावळ्यात मागील वर्षीची सरासरी ओलांडली आहे.