पवारांचा ‘बालेकिल्ला’ कोणाकडे?

0

बारामतीत शक्तिप्रदर्शनास सुरुवात; खा. सुळे यांना भाजपचे कडवे आव्हान!

बारामती : लोकसभेची निवडणूक अवघ्या चार पाच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यामुळे बारामती लोकसभा मतदार संघासाठी विरोधी पक्षाच्यावतीने विविध नावे पुढे येत आहेत. हा मतदार संघ पवारांचा बालेकिल्ला असला तरी या किल्ल्याला 2014च्या निवडणुकीपासून चांगलेच धक्के बसू लागले आहेत. या मतदार संघाचे प्रतिनिधित्व शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या करीत आहेत. खुद्द बारामतीमध्येच विरोधकांना 46 टक्के मतदान होत असल्याचे मागच्या निकालावरून दिसून येत आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकरांनी तगडी लढत देऊन सुळे यांचे मताधिक्य चांगलेच घटवून दाखवले होते. खा. सुळे या फक्त 67 हजार मतांनी निवडून आल्या.

कुल यांचे नाव मुद्दामहून

काही राजकीय निरीक्षकांच्यामते कदाचित 2019ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच बारामतीतून उमेद्वार असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याचमुळे कदाचित कुल यांचे नाव मुद्दामहून सामोरे केले जात आहे. विशेषत: प्रसार माध्यमातूनच या वावड्या उडवल्या जात असल्याचा आरोपही राष्ट्रीय समाज पक्षाने केला आहे.

दौंड बाहेर उमेदवारी?

सध्याच्या परिस्थितीत दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या लोकसभेसाठी इच्छुक असल्याने शक्तिप्रदर्शन सुरू झाले आहे. परंतु कुल या दौंडच्या बाहेर निवडणुकीसाठी चालतील की नाही या विषयीच मुळी शंका आहे. कै. सुभाषअण्णा कुल यांचे दौंड तालुक्यात प्रगती व विकासाकरीता मोठे योगदान आहे. हे नाकारून चालणार नाही. परंतु आता दुसरी पिढी राजकारणात उतरलेली आहे. या पिढीचे विचार व राजकीय क्षमता विचारात घेता, बारामती लोकसभा मतदार संघात अतिशय तगड्या उमेदवाराची गरज आहे.

शिवसेनेचे मतदारसंघात फारसे काम नाही

बारामती लोकसभा मतदार संघ हा 2014पर्यंत विरोधकांच्या दृष्टीने तसा फारसा महत्त्वाचा मानला जात नव्हता. मात्र 2014च्या निवडणुकीत खा. सुळे या काठावर पास झाल्यानंतर भाजपने या मतदार संघाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. परंतु भाजपचे तडजोडीचे राजकारण पाहता या मतदार संघाचा नक्की कोण उमेदवार असेल. याविषयी केवळ आडाखेच बांधले जात आहेत. या मतदार संघात शिवसेनेचे फारसे काम नसल्यामुळे शिवसेना यासाठी उत्सुक असणारच नाही हे उघड आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच ही निवडणूक राहणार आहे. गेल्या निवडणुकीत निसटता पराभव स्वीकारणारे जानकर खासदार ताईंसमोर कसे आव्हान उभे करतात; आणि ताईही कशी मुसंडी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पवारांना अडकवून ठेवण्याची राजनिती

बारामती मतदारसंघात व पुणे जिल्ह्यात पवारांना अडकवून ठेवण्याची राजनिती भाजप आखत आहे. त्यामुळे बारामती मतदार लोकसभा मतदार संघासाठी तगड्या व लोकसंपर्क असलेल्या उमेदवाराच्या शोधात भाजप आहे. त्यामुळे कांचन कुल यांचे नाव या स्पर्धेत टिकणार नाही तसेच एवढा मोठा उमदवार देण्याची चूक भाजप करणार नाही. अशीही अटकळ बांधली जात आहे. राज्याचे दुग्ध व पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे बारामतीला सातत्याने येऊन गावोगावी भेटी देत आहेत. मी स्वत:च बारामतीतील लोकसभेची निवडणूक लढविणार आहे, असेही जाहीरपणे सांगतात. त्यांच्या वाढलेल्या दौर्‍यामुळे व जनसंपर्कामुळे चांगलीच चर्चा नागरीकांमध्ये रंगत आहे.