नवी दिल्ली: राज्यातील सत्तास्थापनेबाबत आज दिल्लीत ठोस अशी भूमिका जाहीर होईल असे अपेक्षित होते. मात्र कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट झाली. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात जवळपास ४५ मिनिटे बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत सरकार बनविण्याबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नाही. ही काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत बैठक होती. त्यामुळे इतर कोणत्याही पक्षाबाबत बैठकीत चर्चाच झाली नाही असे सांगत शरद पवारांनी शिवसेनेची पुन्हा कोंडी केली आहे, त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.
सोनिया गांधी यांच्यासोबत आमची बैठक झाली. महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान अहमद पटेलदेखील उपस्थित होते. ही चर्चा झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होईल. याबाबत पक्षातील नेत्यांची मते जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत असे त्यांनी सांगितले.
आम्हाला राज्यपालांनी सहा महिन्याचा अवधी दिलेला आहे. शिवसेनेने १७० आमदारांचा आकडा कुठून आणला याची कल्पना नाही, हा प्रश्न शिवसेना नेत्यांना विचारा असं पवार म्हणाले मात्र पत्रकारांनी सांगितलं की, काँग्रेस-राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे असा दावा शिवसेना करतंय त्यावर पवारांनी आम्ही सगळ्यांसोबत आहोत. तुम्ही त्यांनाच विचारा हा आकडा कुठून आला? किमान समान कार्यक्रम ठरविण्याबाबत आम्ही काहीच बोललो नाही असं सांगत राज्यातील सत्तास्थापनेबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.
बैठकीत कोणत्याही पक्षासोबत सरकार बनविण्यावरुन चर्चा झाली नाही. जे संख्याबळ आहे त्याबाबत चर्चा झाली. आमच्यासोबत समाजवादी पार्टी, स्वाभिमान शेतकरी संघटना, कवाडे गट अशा अनेक संघटना आघाडीत होत्या. आघाडीतल्या मित्रपक्षांना नाराज करु शकत नाही. जे लोकं आमच्यासोबत निवडणुकीत होते त्यांना विचारात घ्यावं लागणार आहे असंही शरद पवारांनी सांगितले.