‘पवारां‘ना ओळखत नाही म्हणणार्‍या बारणेंची बुद्धी भ्रष्ट 

0
विरोधी पक्षनेता दत्ता साने यांचा खा.बारणेंवर पलटवार
पिंपरी चिंचवड : शरद पवार देशाचे नेते आहेत. महाराष्ट्राचे कैवारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा जाणता राजाच्या नातवाला खासदार श्रीरंग बारणे ओळखत नाही. ही एक शोकांतिका आहे. पवारांनी देशाला आणि महाराष्ट्राला खूप काही दिले आहे, अशा जाणता राजाच्या कुटुंबियांना, मी ओळखत नसल्याचे सांगणे म्हणजे बालिशपणाचे प्रतिक असल्याचे दिसून येते. यावरूनच, खासदार श्रीरंग बारणे यांना संसदरत्न पुरस्कार कसा, आणि कशासाठी मिळाला, यावर जरा विचार करण्याची सामान्यांना गरज आहे. असा पलटवार महापालिकेचे विरोधी पक्षनेता दत्ता साने यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर केला आहे. कोण पार्थ पवार? आपण कुठल्याच पवारांना ओळखत नाही, असे वक्तव्य खा. बारणे यांनी गुरुवारी (दि.10) एका पत्रकार परिषदेत केले होते. त्यावर दत्ता साने यांनी प्रत्युत्तर दिले.
बारणेंना डिपॉझिज जप्त होण्याची भिती…
महापालिकेच्या शिवसेना कक्षात खा.श्रीरंग बारणे यांनी शास्तीकरासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी, पत्रकारांच्या प्रश्‍नावर खा.बारणे यांनी ‘कोण पार्थ पवार? आपण कुठल्याही पवारांना ओळखत नाही’ असे म्हटले होते. त्यावर उत्तर देताना विरोधी पक्षनेता दत्ता साने यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. आप्पा नुसते गप्पा मारण्याचे काम करतात. शरद पवार हे देशाचे नेतृत्व आहे. त्यांनी दिल्लीत महाराष्ट्राची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 55 वर्षांचा त्यांचा राजकीय अनुभव आहे. पार्थ पवार हे नाव निव्वळ चर्चेत आहे. त्यांना अजूनही उमेदवारी जाहीर झालेली नाही. खासदार श्रीरंग बारणे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पराभवाची भिती वाटू लागली आहे. मावळ लोकसभा मतदार संघात आपले डिपॉझिट जप्त होणार असल्याचे त्यांना वाटत आहे. पवार यांना ओळखत नाही म्हणत खासदारांचा बालिशपणा दिसून येतो. यावरून त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली की काय, असा प्रश्‍न उपस्थित होतो. यावर त्यांनी आपले आत्मपरिक्षण करावे, असा सल्लाही साने यांनी यावेळी दिला.
स्थायी समितीचे सभापतीपद मिळाले; विसरू नका…
श्रीरंग बारणे हे नगरसेवक पदावरून थेट खासदार झालेले आहेत. त्यामुळे त्यांना निवडणुकांमधील पायर्‍या तसेच टप्पे माहित नाहीत. त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. पार्थ पवारांच्या बॅनरची भिती त्यांना आतमधून धजावत आहे. पार्थ पवार निवडणुक लढणार यावर अजूनही कुठेही स्पष्ट झालेले नाही. उमेदवारी जाहीर व्हायची आहे. डिपॉझिट जप्त होण्याची बारणेंना भिती वाटू लागल्याचे यावरून स्पष्ट होते. बारणेंना स्थायीचे सभापतीपद पवारांमुळेच मिळाले, हे त्यांनी विसरू नये. श्रीरंग बारणे पवार घराण्याला ओळखत नसतील तर यापेक्षा शहराचे दुर्भांग्य काय? असेही ते म्हणाले.