पवारांनी घेतली सोनियांची भेट!

0

नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदासाठी विरोधकांकडून सर्वसहमतीने एकच उमेदवार देण्यात यावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सर्वसहमतीचे नाव म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव पुढे आले आहे. तथापि, पवारांच्या नावासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सहमती अत्यावश्यक असल्याने राजकीय घडामोडींना नवी दिल्लीत वेग आलेला आहे. स्वतः पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन यासंबंधी चर्चा केल्याची माहिती सूत्राने दिली. या निवडणुकीत आपण उभे राहणार नसल्याचे पवार उघडपणे सांगत असले तरी, स्वतःच्या उमेदवारीसाठी त्यांच्याकडून पडद्याआड जोरदार प्रयत्न सुरु आहेत. सोनियांच्या भेटीत त्यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत प्रदीर्घ चर्चा केली. तसेच, विद्यमान राजकीय परिस्थितीबाबतही त्यांना अवगत केले. विरोधी पक्षातर्फे या निवडणुकीसाठी सर्वसहमतीचा उमेदवार देण्याकरिता सोनिया गांधी याच नेतृत्व करत असल्याने पवारांची त्यांच्याशी भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. पवार यांना महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना पक्षाचाही पाठिंबा असल्याचे मानले जात आहे.

पवारांना डावे, शिवसेनेसह इतरांचा पाठिंबा!
विरोधी पक्षातर्फे सर्वसहमतीचा उमेदवार देण्याकरिता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. तर या पदासाठी निवडणूक न घेता सत्ताधारी व विरोधी पक्षांनी एकच उमेदवार द्यावा, अशी सूचना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली होती. दुसरीकडे, डाव्या पक्षांसह शिवसेनेनेदेखील राष्ट्रपतिपदासाठी शरद पवार यांच्या नावाला सहमती दर्शविलेली आहे. जुलै महिन्यात या पदासाठी निवडणूक होणार असून, त्यासाठी राजकीय घडामोडींना राजधानी दिल्लीत वेग आलेला आहे. शरद पवार यांनी सोनियांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व या पार्श्‍वभूमीवर तब्बल अर्धातास चर्चा केली. या चर्चेचा तपशील हाती आला नसला तरी, राष्ट्रपतिपदासाठी कोण उमेदवार असावा, यावर चर्चा झाल्याचे कळते. भाजपकडून ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरलीमनोहर जोशी यांचे नाव पुढे आले आहे. तथापि, या दोघांवर बाबरी पतनप्रकरणी खटला चालविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या दोघांची नावे आपसूक शर्यतीतून बाहेर पडणार आहेत.

शरद यादवही शर्यतीत!
शिवसेनेने रा. स्व. संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांचे नाव पुढे केले असले तरी, आपण कोणतीही निवडणूक लढविणार नाही, अशी भूमिका यापूर्वीच डॉ. भागवत यांनी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीसाठी शिवसेनेने शरद पवार यांच्या नावाला पसंती दिली आहे. काँग्रेसचा पाठिंबा मिळाला तर शरद पवार यांच्या नावाला शिवसेना, डावे पक्ष, काँग्रेस आणि इतर पक्षांचा पाठिंबा मिळू शकतो. राष्ट्रपतिपदासाठी आवश्यक असलेली मते गृहीत धरता, पवारांच्या विजयाची निश्‍चितता निर्माण होते. तथापि, पंतप्रधान मोदींनीही पवारांच्या नावाला पाठिंबा द्यावा, यासाठी राजकीय कसरत सद्या दिल्लीत सुरु आहे. पवारांच्या पूर्वी राष्ट्रीय जनता दल (संयुक्त)चे नेते शरद यादव यांनीही सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. तत्पूर्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, डाव्या पक्षाचे नेते सीताराम येंचुरी व डी. राजा यांचीदेखील भेट घेतली होती. शरद पवार किंवा शरद यादव या दोघांपैकी एका नावावर विरोधक सहमती करतील, अशी शक्यता राजकीय सूत्राने वर्तविली आहे.