पशुधनाला दुष्काळाचा फटका

0

वाळलेला चारा ठरतोय वरदान, दुग्धोत्पादनात घट
शहादा
: दुष्काळाची दाहकता मे महिन्यात जास्त जाणवू लागली आहे. शहादा तालुक्यातील पूर्व, उत्तर भागातील असलोद, मंदाणा, कळंबू, सारंगखेडा, अनरद, पुसनद, कुकावल, कोठली, मातकुट, बोराडेसह परिसरातील पशुधनाला दुष्काळाचा फटका बसत आहे. प्रथिनेयुक्त खाद्य व हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाल्याने वाळलेल्या चार्‍यावर जनावरांची भूक भागवावी लागत आहे. त्याचा परिणाम दुधाळ जनावरांवर जास्त प्रमाणात होत असल्याने दुग्धोत्पादनात घट झाली आहे.

दुष्काळाची दाहकता मे महिन्यात जास्त जाणवू लागली आहे. वाढत्या उन्हाबरोबर दुष्काळाचा परिसरातील पशुधनाला फटका बसत आहे. दुधाळ जनावरांसाठी आवश्यक असलेल्या सरकीच्या ढेपीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पशुपालकांना ढेप खरेदी करणे परवडत नसल्याने परिसरातील असंख्य दुधाळ जनावरांची भूक वाळलेल्या चार्‍यावर भागवली जात आहे. परिणामी, दुग्धोत्पादनाला फटका बसत आहे. दुधाळ जनावरांच्या खाद्याकडे विशेष लक्ष दिल्यास दूध वाढविण्यासाठी मोठा फायदा होतो. त्यामध्ये प्रथिनेयुक्त खाद्य त्यांना मिळाले तर गाई, म्हशींचे आरोग्य चांगले राहते. परंतु सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे प्रथिनेयुक्त खाद्य किंवा हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यातही वेगवेगळ्या खाद्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. हे दर पशुधन पालकांना परवडणारे नाहीत.

नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ तीव्र स्वरूपाचा असल्याने याचा फटका पशुधनालाही अधिक बसत आहे. दुष्काळी परिस्थितीत लहान पशुधनाला प्रती दिवस 20 लिटर साधारणपणे पिण्यास पाणी तर 3 किलो चारा तर मोठ्या पशुधनाला 40 लिटर पाणी अन् 6 किलो चारा लागत असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकार्‍यांनी सांगितले. यावर्षी कूपनलिकेचे पाणी आटल्याने हिरव्या चार्‍याचे उत्पादन घेणे कठीण झाले आहे. यामुळे दुधाळ पशुधनाची भूक कांदापात, तूर, हरभरा या वाळलेल्या चार्‍यावरच भागवावी लागत आहे. किरकोळ ठिकाणीच हिरवा मका, बहुवार्षिक धान्याचा चारा पशुधनाला टाकला आहे. सध्या वाळलेला चाराच पशुधनासाठी वरदान ठरत आहे. पशुधनाची भूक वाळलेल्या चार्‍यावर काही दिवस भागू शकेल, एवढी तरतूद असली तरी हिरवा चारा नसल्याने दूध उत्पादन 10 ते 15 टक्क्याने घटले आहे.