पसंती मुंबई विद्यापीठालाच!

0

मुंबई । निकालाच्या घोळामुळे प्रचंड वादात सापडलेल्या मुंबई विद्यापीठाची प्रचंड नाचक्की झाली होती. या प्रकरणात राज्यपालांसह तत्कालीन कुलगुरूंना रोषाचा सामना करावा लागला होता. या प्रकरणात तत्कालीन कुलगुरू संजय देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या लोकप्रियतेवर या गोष्टींचा विपरीत परिणाम होईल असे वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही. याउलट शैक्षणिक वर्ष 2017-18मध्ये मुंबई विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयात विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढली आहे. विद्यापीठाच्या विविध पारंपरिक, व्यावसायिक, नावीन्यपूर्ण आणि कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांसाठी 2 लाख 60 हजार 746 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मागील शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये 2 लाख 37 हजार 230 विद्यार्थ्यांनी पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला होता. यावर्षी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशात मोठी वाढ झाली असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. या वर्षीच्या प्रवेशांमध्ये वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमांकरिता 1 लाख 44 हजार 141 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून विज्ञान शाखेसाठी 45 हजार 381 एवढे प्रवेश झाले आहेत. कला शाखेसाठी 42 हजार 161 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून तंत्रज्ञान शाखेसाठी 23 हजार 337 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. विधी शाखेसाठी 5 हजार 124 विद्यार्थी, तर फाइन आर्टसाठी 504 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये विविध पारंपरिक, व्यावसायिक, कौशल्याधारित आणि नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष 2017-18साठी दोन लाख 60 हजार 746 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मागील आठ वर्षांच्या प्रवेशांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या शैक्षणिक वर्षात पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी सर्वाधिक प्रवेश झाले आहेत. मुंबई विद्यापीठामार्फत पदवीपूर्व प्रवेशासाठी विविध शाखानिहाय एकूण 368 अभ्यासक्रम राबवले जातात. कला शाखेसाठी 165 अभ्यासक्रम, वाणिज्य 32, विज्ञान 39, विधी 6, तंत्रज्ञान 11, फाइन आर्ट 26, अ‍ॅडऑन कोर्सेस 67, बीव्होक 1 आणि गरवारे संस्थेमार्फत 21, असे विविध 368 अभ्यासक्रम राबवले जात आहेत.

ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणार्‍या मुंबई विद्यापीठाने समाजाचे बौद्धिक आणि नैतिक शक्तिस्थान म्हणून गेल्या 161 वर्षांत भरीव कामगिरी करत सामाजिक मूल्य आणि संधींची सतत वाढणारी जबाबदारी उत्साहाने वागवत देशाला विशेषतः महाराष्ट्र आणि मुंबई शहराला उत्तम गुणवत्ता दिली आहे. कालपरत्वे होणार्‍या नवीन बदलांमुळे विद्यार्थ्यांची विद्यापीठावरची विश्‍वासार्हता वाढली आहे. मागील आठ वर्षांच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक प्रवेश झाले आहेत, हे त्याचेच एक फलित आहे.
– डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ.

गेल्या आठ वर्षांत प्रवेश
2016-17 – 2 लाख 34 हजार 230
2015-16 – 2 लाख 37 हजार 661
2014-15 – 2 लाख 33 हजार 979
2013-14 – 2 लाख 3 हजार 629
2012-13 – 1 लाख 97 हजार 770
2011-12 – 2 लाख 2 हजार 637
2010-11 – 2 लाख 3 हजार 483
2009-2010 – 2 लाख 476