पहिली उचल 2500 रुपयांची

0

यवत । पाटस, तालुका दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात (2017-18) गाळपासाठी आलेल्या उसाच्या पहिल्या हप्त्यासाठीची 2500 रूपयांची पहिली उचल सभासदांना धनादेशाद्धारे अदा करणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व आमदार राहुल कुल यांनी संचालक मंडळाच्या वतीने दिली. आमदार कुल यांनी दिलेल्या प्रसिद्धि पत्रकात म्हटले आहे की, आपण सुरवातीला 2601 रूपये प्रतिटनाप्रमाणे उसाला बाजारभाव देण्याचे जाहीर केले आहे. त्या वेळेस साखरेचा दर प्रतिक्विंटल 3500 रूपये ते 3600 रूपयांदरम्यान होता.

आजमितीला साखरेचा दर तीन हजार ते तीन हजार शंभर रूपयांदरम्यान खाली आला आहे. त्यामुळे साखरेच्या दरात प्रतिक्विंटल पाचशे रूपयांची तफावत आहे. सध्या कारखाना चालविताना आथिक ओढाताण होत असून देश व राज्यातील साखर कारखानदारीला या संकटाचा फटका बसत आहे. भविष्यात साखर दरात सुधारणा होण्याची शक्यता असून त्या परिस्थितित उर्वरित 100 रूपये प्रतिटन रक्कम देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील राहील.

1 लाख 79 हजार टन गाळप
चालू गळीत हंगामात आजअखेर 1 लाख 79 हजार टन ऊस गाळप झाले आहे. आजअखेर एक लाख 58 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा 9.55 टक्के इतका आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू असून चार दिवसांत आसवनी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. कारखान्याचा दैनंदिन साखरउतारा चांगला असून पूर्ण क्षमतेने गाळप करण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. सभासद शेतकर्‍यांच्या मालकीचा हा कारखाना असून जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या बरोबरीने बाजारभाव घायला आम्ही कमी पडणार नाही. शेतकर्‍यांनी भीमा पाटसला जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही कुल यांनी केले आहे.