शेतकरी पारतंत्र्य दिवसानिमित्त किसानपुत्र आंदोलनच्या वतीने कार्यक्रम
मुंबई:- 18 जून 1951 रोजी पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली होती. ही घटना दुरुस्ती शेतकऱ्यांना पारतंत्र्यात घालणारी होती. या घटनादुरुस्तीमध्ये कलम 31-B चा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यावर अनेक कायदे क्रूर कायदे थोपविण्यात आले आहेत, या विरोधात सनदशीर मार्गाने सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले आहे. शेतकरी विरोधी कायदे आणि धोरणांचा विरोध करण्यासाठी मुंबईसारख्या शहरात दलित पँथरसारखे किसान पँथर स्थापन करावे असे प्रतिपादन किसानपुत्र आंदोलनाचे संयोजक तसेच लेखक अमर हबीब यांनी केले. किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शेतकरी पारतंत्र्य दिवसानिमित्त मुंबई पत्रकार संघात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमर हबीब यांच्या ‘शेतकरीविरोधी कायदे का रद्द करावेत?’ या मराठी पुस्तिकेची इंग्रजी व हिंदी भाषांतरेही प्रकाशित करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमात 31 ब विरोधात याचिका दाखल करणारे मकरंद डोईजड, सर्वोच्च न्यायालयातील वकील अनुज सक्सेना, शेतकरी प्रश्न अत्यंत संवेदनशीलतेने उलगडणारे अमरावती जिल्ह्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर आशिष लोहे, डॉ. संदीप कडवे यांनी यावेळी या घटना दुरुस्ती बद्दल आपले विचार मांडले. शेतकऱयांचे स्वातंत्र्य हिरावणारी पहिली घटना दुरुस्ती 18 जून 1951 ला झाली होती म्हणून हा कार्यक्रम 18 जूनला ठेवण्यात आला असल्याचे सुरुवातीला अमर हबीब यांनी सांगितले.
१८ जून १९५१ पासूनच संसदेने शेतकऱ्यांबरोबर सर्वोच्च न्यायालयाला ही गुलामी करण्यास भाग पाडले आहे, असे किसानपुत्र मकरंद डोईजड यावेळी म्हणाले. माझ्या जीवनाचे ध्येयच हे कायदे रद्द करणे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कुठलीही चुकी नसताना शेतकरी हा सर्वात मोठा गुन्हेगार असल्याचे या कायद्यामुळे भासतेय. शेतकऱ्यांना जगण्याची कुठलीही सोय इथे नसताना मरणाकडे लोटणारे हे कायदे त्यांच्या डोक्यावर तलवारीसारखे लटकत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या शेतकरीविरोधी कायदे रद्द करा असा सूर या कार्यक्रमातून निघाला. किसानपुत्र आंदोलनाने शेतकरी प्रश्नाची खोलात जाऊन उकल केली आहे, आंदोलनाचे रणांगण आणि तंत्रही बदलले असून त्या पद्धतीने लढाई सुरू करण्यात आली असल्याचे ऍड. अनुज सक्सेना यांनी यावेळी सांगितले. तसेच हे कायदे रद्द करण्यासाठी अगदी नेटाने बाजू लढवू असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला गझलनवाज भीमराव पांचाळे, शेतकरी आंदोलनाचे नेते गिरीधर पाटील यांच्यासह अनेक आंदोलनातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.