विवाहितेचा 5 लाखांसाठी छळ; शहर पोलिसात गुन्हा
जळगाव । शहरातील गेंदालाल मील परिसरात राहणार्या 28 वर्षीय विवाहितेच्या पतीने पहिली पत्नी हयात असतानाही दुसरा विवाह करून फसवणूक केली. तसेच नवीन घर घेण्यासाठी माहेरून 5 लाख रूपये आणावे म्हणून छळ केल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय नगरातील रहिवासी विवाहितेचा विवाह 27 मार्च 2015 रोजी बौध्द विवाह पध्दतीने प्रशांत बाबूलाल सोनवणे यांच्याशी झाला होता. लग्नाअगोदर मुलगा प्रशांत हा इटारसी येथे रेल्वेत नोकरीस असल्याचे सांगण्यात आले होते मात्र प्रशांत हा खाजगी फोटोग्राफीचा व्यवसाय करीत असल्याचे लग्नानंतर विवाहित काही महिन्यानंतर पती प्रशांत, सासू उषा बाबूलाल सोनवणे, सासरे बाबुलाल सोनवणे हे काहीही कारण देत माया यांचा छळ करू लागले.
सासू-सासर्यांनी वेगळे राहण्यास सांगितल्यानंतर विवाहिता व त्यांचे पती प्रशांत हे भुरे मामलेदार प्लॉट परिसरात भाड्याने घर घेवून राहू लागले. एके दिवशी पिडीत महिला घरात असताना एक महिला घरी आली व मी प्रशांतची पत्नी अनिता असल्याचे तिने सांगितले. 13 ऑगस्ट 2017 रोजी माया यांचे भाऊ अनिल सपकाळे व सागर हरताळे हे पती प्रशांत यांना समजाविण्यासाठी दत्तात्रय नगर, कानळदा रोड येथील घरी गेले होते. यावेळी सासरच्या कुटूंबियांनी शिवीगाळ व मारहाण केली. तसेच नवीन घर घेण्यासाठी माहेरून 5 लाख रूपये घेवून येण्याची मागणी केली. वारंवार होणार्या छळाविरूध्द विवाहिता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.