मुक्ताईनगर- महाराष्ट्रातील मानाच्या प्रमुख सात पालखी सोहळ्यातील संत मुक्ताबाई महाराज पालखी सोहळा 34 दिवसात तब्बल 700 किलोमीटरचा प्रवास करीत आज शुक्रवारी दुपारी भुवैकूंठ पंढरीत आगमन करीत आहे. 309 वर्षापासून अखंडीतपणे आषाढी वारीसाठी पालखी सोहळा निघतो तर श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक दिंड्यासह वारकरी येथे येत असतात. श्री संत मुक्ताबाई पालखीने सर्वात पहिले आगमन केल्यानंतरच इतर संताच्या दिंड्या पालखी सोहळे पंढरीत दाखल होतात, अशी परंपरा आहे. तालुक्यातील आष्टी येथे पालखीचे आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांनी जोरदार आतषबाजी केली. शुक्रवारी पहाटे येथून दिंडी मार्गस्थ होवून दुपारी पंढरपूरात पोहोचणार आहे. वारकर्यांना विठ्ठल दर्शनाची आस लागली असून शुक्रवारी दुपारचा विसावा रोपळे येथे घेवून वारकरी पंढरपूर पेाहोचणार आहेत.
आठ दिवस पंढरपूर मुक्काम
दत्त घाटावरील प्रशस्त मुक्ताबाई मठात आठ दिवस पालखी मुक्काम राहील. तेथे वारकर्यांसाठी निवास भोजन चहा-नास्ता केली जाते. 22 रोजी वाखरी येथे सकळसंताच्या पालखी सोहळे सामोरे जाण्याचा मान मुक्ताईनगर पालखीला आहे. तेथे निवृत्ती, नामदेव , सोपान, मुक्ताबाई , एकनाथ, नामदेव, तुकाराम या संताचे भेट सोहळा होवून पंढरपूरात सर्व पालख्या प्रवेश करतील. आषाढी एकादशीस सकाळी नगरपरीक्रमा होईल. गुरूपौर्णिमेला गोपाळपूर येथे काला व त्यानंतर पांडुरंगाचा निरोप घेत मुक्ताईनगरकडे सोहळा प्रस्थान करेल. आठ दिवस मठात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांसह कीर्तने होतील.
नैवेद्याचा पहिला मान मुक्ताईला
आषाढीकरिता आलेल्या प्रमुख संताच्या पालखी सोहळ्याकडून विठ्ठल-रूख्मिणीस नैवेद्य देण्यात येतो. श्री संत मुक्ताईच्या दशमीपासूनच पहिलाच नैवेद्य देवाला दिला जातो. इतर पालखी एकादशी किवा द्वादशीपासून नैवेद्य नेतात.