भाजपा-सेनेतर्फे इच्छुकांची चाचपणी ; दाखल्यांच्या जमवा-जमवीत इच्छुकांची तारांबळ
मुक्ताईनगर- नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असलीतरी पहिल्या दिवशी एकही उमेदवारांनी अर्ज सादर केला नसल्याची माहिती निवडणूक सूत्रांनी दिली. निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांकडे जातपडताळणीसह नगरपंचायतीचा नाहरकत व शौचालय असल्याचा दाखला, चारीत्र्य पडताळणी, बँक खात्यांची डिटेक्स आदी कागदपत्रे नसल्याने त्यांची जमवा-जमव करण्यात इच्छूक व्यस्त असल्याने अद्याप काही दिवस उमेदवारी अर्ज दाखल होणार नसल्याचे एकूणच चित्र आहे.
भाजपा-सेनेतर्फे इच्छुकांची चाचपणी
नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपा-सेनेतर्फे इच्छूक उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याने कोणत्याही पक्षाने अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही. काँग्रेसनेही निवडणुकीसाठी षड्डू ठोकले असून कोणत्याही पक्षाने अद्याप आघाडीची घोषणा केलेली नाही, असे एकूणच चित्र आहे.
अंतिम यादीनंतरही घोळ कायम
अंतिम मतदारयादी प्रसिद्धी नंतरही मतदारयाद्यांमध्ये घोळ झाल्याची ओरड असतानाच ज्या ठिकाणी अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर बदल घडवला गेला असल्यास अशा प्रभागात यादीतील मतदार क्रमांकात बदल होण्याची भीती आहे त्यामुळे अशा वेळी उमेदवारी अर्ज भरताना यादीतील मतदार क्रमांकाची खात्री करूनच अर्ज भरावा लागेल, असे जाणकारांना वाटते.
लोकनियुक्त नगराध्यक्ष होणार कोण?
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती महिला आरक्षण असून या पदासाठी कुणाची वर्णी लागते? याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या पदासाठी अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृतरीत्या कुणाच्या नावाची घोषणा केलेली नाही त्यामुळे या जागेसाठी होणारी लढतदेखील रंगतदार ठरणार आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी विविध पक्ष आपले पत्ते उलगडतील, असे राजकीय समीक्षकांना वाटते.