पहुर येथे खांब्यातून जमिनीत उतरला वीजप्रवाह

0

पहूर । येथे उच्च दाबाची वाहिनी असलेल्या वीज तारेचे वीजरोधक (इन्सुलेटर) फुटले. परिणामी, तारेचा खांब्याच्या माध्यमातून जमिनीशी संपर्क आल्याने वीजप्रवाह थेट जमिनीत उतरले. जमीन जळून त्यातून लाव्हारसासारख्या ज्वाळा निघायला लागल्या. जमिनीतून लाव्हारस निघाल्याच्या अफवेमुळे गावभर एकच खळबळ उडाली. ही घटना रविवारी घडली. पहूर गावाजवळील 132 केव्ही वीज उपकेंद्र आहे. जमीन कोरडी असल्याने पुरेशी आर्थिंग मिळाली नाही. त्यामुळे लाइन गेली नाही. वीजप्रवाह सुरूच राहिल्याने खांबातून उतरलेल्या वीजप्रवाहामुळे जमीन तापून अक्षरश: जळू लागली. आगीच्या ज्वाळा धूूर निघत असल्याचे कर्तव्यावर असलेल्या ऑपरेटर रमेश कराड यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर येथे नागरिकांनी गर्दी केली होती.

वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ गोविंदा धनगर यांनी हा लाव्हारस नसल्याचे सांगताच नागरिकांचा जीव भांड्यात पडला. रविवारी पहूरचा आठवडे बाजार असतो. त्यामुळे इतर दिवसांपेक्षा नागरिकांची या दिवशी वर्दळ अधिक असते. त्यात लाव्हारस निघत असल्याची चर्चा कानी पडताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन एकच गर्दी केली. यामुळे काही वेळ या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी झाल्याने नागरीकांची गैरसोय झाली. मात्र, वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ गोविंदा धनगर यांनी सत्यता निदर्शनास आणून देत प्रवाह बंद केल्यानंतर गर्दी ओसरली.

मोठा अनर्थ टळला
गोंदेगावकडे जाणार्‍या या खांबावरील फीडर बंद करताच ज्वाळा निघणे बंद झाले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जुन्या तंत्रज्ञानाचेरिले आजही वापरले जात आहेत. यामुळे एखाद्या ठिकाणी आर्थिंग पुरेशी मिळाल्यास ब्रेकर काम करीत नाही. तसेच रिले लाइन ट्रिप करत नाहीत. अशावेळी वीजप्रवाह सुरूच राहिल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. तार तुटताच किंवा शॉर्टसर्किट होताच रिले ट्रिप झाला पाहिजे.