पांझरा नदीकाठावर 28 अतिक्रमणांवर हातोडा!

0

धुळे । पांझरा नदी काठावर आमदार अनिल गोटे यांच्या संकल्पनेतून रस्त्याचे काम सुरु आहे. दोन्ही बाजूस साडेपाच साडेपाच किमी लांबीचे रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. या दोन्ही बाजूच्या प्रस्तावित रस्त्यांना अडथळा ठरणार्‍या 28 अतिक्रमणांवर सोमवारी 8 रोजी सकाळी जेसीबी फिरविण्यात आले. गणपतीपूल ते ब्रीजकम बंधार्‍यापर्यंतच्या क्षेत्रात ही कारवाई करण्यात आली. पांझरानदी किनारी गवळी समाज बांधवांची स्मशानभूमी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या ठिकाणी स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण हटाव कारवाई करु नये, स्मशान भूमीची जागा सोडून रस्त्याचे काम करावे, अशी मागणी गवळी समाजाच्या पदाधिकार्‍यांनी केली. यावेळी काही काळ तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती.

यांची होती उपस्थिती
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, उपअभियंता एम.ए. शाह, शाखा अभियंता एस.डी. साबळे, झाल्टे, राहूल पाटील, एस.ए. गायकवाड, एच. एच. बागूल, महानगरपालिका नगररचनाकार पी.डी. चव्हाण यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. अतिक्रमण कारवाई वेळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या एपीआय सरिता भांड, पोलिस उपनिरिक्षक पाटील आदी उपस्थित होते.