पाकच्या कोंडीची भारताची व्यूहरचना

0

नवी दिल्ली : दहशतवादी संघटनांची आर्थिक रसद बंद करण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानवर दबाव टाकण्यासाठी भारताने प्रयत्न सुरु केले आहेत. वित्तीय कृती दलाची (एफएटीएफ) 19 फेब्रुवारीपासून पॅरिसमध्ये पाच दिवसांची बैठक सुरु होणार आहे. त्यात जागतिक पातळीवरील आर्थिक व्यवहारांमध्ये पाकिस्तानमधून झालेल्या व्यवहारांची तपासणी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पाकिस्तानने वित्तीय कृती दलाला गेल्या महिन्यात अहवाल सादर केला. पाकिस्तानने दहशतवादी संघटनांची आर्थिक रसद बंद करण्यासाठी काय कारवाई केली याचा उल्लेख त्यात होता. लष्कर ए तय्यबा सारख्या संघटनेविरोधात कठोर भूमिका घेता येणार नाही. या संघटनेत स्थानिक सदस्यांचे प्रमाण जास्त आहे. कारवाई केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे पाकिस्तानने आपल्या अहवालात नमूद केले आहे. लष्करचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तानने स्थानबद्ध केले असले, तरी त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

पॅरिसमधील बैठकीत अमेरिका आणि भारताचे अधिकारी याच मुद्द्यांवरून पाकिस्तानवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. लष्कर ए तय्यबासारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये सक्रीय असून, विविध उपक्रमांच्या माध्यमांतून या संघटना आर्थिक पाठिंबा मिळवत असल्याचा दावा भारत या बैठकीत करणार आहे. या संदर्भातील पुरावेही मांडले जाणार आहेत, असे या सूत्रानी सांगितले.