नवी दिल्ली। पाक लष्कराच्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाल्याची घटना जम्मू-काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील नौशेरा भागात शुक्रवारी घडली. पाक लष्कराने सकाळपासूनच राजौरी जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ गोळीबार सुरू केला आहे. संरक्षण मंत्रालयातील प्रवक्ते मनीष मेहता यांनी दिलेली माहिती अशी, की नौशेरा भागात पाक लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पहाटे साडेपाच वाजल्यापासून भारतीय चौक्यावर जोरदार गोळीबार सुरू केला. या गोळीबाराचे भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. हे प्रत्युत्तर देत असताना नायक बख्तावर सिंग हा अत्यंत गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचाराकरता लष्कराच्या रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान ते शहीद झाले.
शनिवारी होणार अंत्यसंस्कार
शहीद झालेले नायक बख्तवार सिंग हे 34 वर्षाचे असून पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील हाजीपूरचे रहिवाशी होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन लहान मुले आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी शनिवारी राजौरी या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती ही मेहता यांनी दिली.