शुभम मस्तपुरे परभणीतील कोनरेवाडीचे!
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी येथे सीमारेषेवर पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात पुन्हा एकदा भारतीय सैन्यातील एक जवान शहीद झाला आहे. हा जवान महाराष्ट्राचा सुपुत्र असून, शुभम सूर्यकांत मस्तपुरे (वय 20) असे त्यांचे नाव आहे. परभणीतील कोनरेवाडी हे त्यांचे गाव आहे.
गोळीबारात 4 जवान जखमी
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असून, मंगळवारी सकाळी पाकने कृष्णा घाटी येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकच्या गोळीबारात जवान शुभम सूर्यकांत मस्तपुरे हे शहीद झाले. शुभम यांच्या पश्चात आई सुनिता असून, त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शुभम हे सैन्यातील धाडसी जवान होते. देशासाठी त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील, असे सैन्याने म्हटले आहे. मंगळवारी पाकने केलेल्या गोळीबारात भारतीय सैन्यातील 4 जवान जखमी झाले. यामध्ये तीन अधिकार्यांचादेखील समावेश आहे. भारतीय सैन्यानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिल्याचे सैन्याच्या प्रवक्त्यांने सांगितले. वर्षभरात पाकिस्तानने 650 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.