पाकड्यांकडून ‘त्या’ शूजची तपासणी

0

म्हणे, शूजमध्ये काही तरी संशयास्पद

इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांच्या पत्नी व आईसोबत पाकिस्तानात झालेल्या व्यवहारावरून भारतात टीकेची झोड उठवलेली असतानाच, कुलभूषण यांच्या पत्नीच्या शूजमध्ये काहीतरी संशयास्पद आढळून आल्याचा आरोप पाकिस्तानने केला. पाकिस्तान त्यांच्या शूजची तपासणीदेखील करत असल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तानने हा आरोप केला असला तरी त्या शूजमध्ये काय सापडले हे मात्र सांगितलेले नाही. तसेच, भारताचे आरोप फेटाळून लावण्याचा केवीलवाना प्रयत्नही त्यांनी केला.

म्हणे, त्यांना नवे शूज घालायला दिले!
आमच्या अधिकार्‍यांना कुलभूषण यांच्या पत्नीच्या शूजमध्ये काहीतरी संशयास्पद आढळून आले; त्यामुळे आम्ही त्यांचे शूज ताब्यात घेतले व त्यांना नवे शूज वापरायला दिले. त्यांचे जुने शूज आम्ही तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यांच्या पत्नी व आईला दागिनेही आम्ही काढायला सांगितले होते; पण ते आम्ही त्यांना परत दिले, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार कार्यालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी सांगितले. दरम्यान, फैसल यांनी भारताचे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत फेटाळून लावले. आम्हाला भारतासोबत वाद घालायचा नाही. भारताने या प्रकरणातील तथ्य मोडून सादर केले आहेत. भारतीय अधिकार्‍यांना जर काही चुकीचे वाटत होते तर त्यांनी त्याचवेळी मीडियाला का नाही सांगितले. भेटीच्या 24 तासानंतर हा कांगावा सुरू केला, असा आरोप फैसल यांनी केला आहे.