भारताकडूनही चोख प्रत्युत्तर
श्रीनगर : पाकिस्तानी सीमा सुरक्षा दलाने शुक्रवारी सकाळी काश्मीरमधील आरएस पुरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जोरदार गोळीबार केला. भारताच्या 30 ते 40 चौक्यांना त्यांनी निशाणा बनविला. दिवसभर हा गोळीबार सुरु होता. भारतीय लष्करानेदेखील या गोळीबारास चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात दोन ग्रामस्थ ठार झाले असून, सात ग्रामस्थ गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारीदेखील पाकड्यांनी कठुआ आणि सांबा सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. त्यात एक जवान शहीद झाला होता. तर एका छोट्या मुलीचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारास भारतीय लष्करदेखील सडेतोड प्रत्युत्तर देत असून, पाकिस्तानचीही मोठी हानी झाल्याची माहिती हाती आली आहे.
पाकड्यांचा गोळीबार सुरुच!
शुक्रवारी पहाटे आरएसपुरा आणि अर्नियाजवळील नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांना लक्ष करत, पाकिस्तान सैनिकांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर थोड्याच वेळात भारतीय नागरिकांनादेखील लक्ष करत गोळीबार केला. भारतीय लष्कराने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूच्या गोळीबारात काही नागरिक जखमीही झालेत. या गोळीबारामुळे आरएसपुरा आणि अर्नियाच्या जवळच्या तीन किलोमीटरपर्यंतच्या भागातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत व नागरिकांनीदेखील सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, अशी सूचना करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात भारतीय लष्कराने पाकिस्तान सैनिक आणि घुसखोरांविरोधात केलेल्या कठोर कारवाईनंतर पाकिस्तान सैनिकांनी बुधवारी आणि त्यानंतर शुक्रवारी आरएसपुरा आणि अर्निया येते गोळीबार करण्यास सुरुवात केली. गेल्या बुधवारी झालेल्या गोळीबारामध्ये भारताच्या एका जवानाला आपला प्राण गमवावा लागला होता, तर या गोळीबार चार नागरिकदेखील जखमी झाले होते.