पाकिस्तानकडून घुसखोरी; दोन घुसखोरांचा खात्मा

0

नौशेरा: पाकिस्तानकडून सीमेवर कुरघोडी सुरु आहे. वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. दरम्यान आता राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. दोन पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा करण्यात आला आहे. भारतीय जवानांकडून करण्यात आलेल्या या कारवाईत दोन पाकिस्तानी घुसखोर तर ठार झाले. शिवाय पाकिस्तानचा अन्य एक घुसखोर जखमी देखील झाला असल्याची माहिती मिळाली आहे. जवानांकडून परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.

उत्तर काश्मीरमधील केरन व मच्छल सेक्टर आणि राजौरीच्या कलला सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न झाला. मात्र, त्या ठिकाणी तैनात असलेल्या जवानांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. या घुसखोरीत पाकिस्तानी सैनिकाबरोबरच दहशतवादी देखील होता. पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार सुरू असलेल्या गोळीबारासही भारतीय जवानांनी चोख उत्तर दिले आहे.

या अगोदर जम्मू-काश्मीरमधील रणबीरगड येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. ज्यामध्ये लष्कर ए तोयबाचा टॉपचा कमांडर इश्फाक रशीद खान व एजाज अहमद यांचा समावेश होता. त्यांच्याकडून एक एके-47 रायफल व पिस्तूल देखील हस्तगत करण्यात आली होती.