इस्लामाबाद । भारतीय नागरिक आणि माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात फाशीची सजा सुनावल्यानंतर दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानने शुक्रवारी जाधव यांचा तपास अहवाल सादर केला. त्यात पाकिस्तानने जाधव यांचा उल्लेख वन मॅन डिमॉलिशन स्क्वॉड असा केला आहे. चार्जशीटमध्ये लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये जाधव यांची प्रतिमा हॉलिवुडमधील फिल्मी पात्र रॅम्बोप्रमाणे असल्याचे दाखवण्यात आले आहे. रॅम्बोप्रमाणे जाधव पाइपलाइनमध्ये स्फोट घडवणे, लष्करी तळांवर आयइडी लावणे आणि इतर स्वरूपाचे विध्वंसक धमाके घडवतात, असा आरोप करण्यात आला आहे.एकीकडे जाधव यांचा विध्वसंक घटनांमध्ये समावेश असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे पण त्यामुळे किती नागरिकांचे नुकसान झाले, किती जणांना शारीरिक इजा झाल्या याची माहिती देण्यात आलेली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताझ अझिझ यांनी जाधव यांच्या संदर्भातील तपास अहवाल सादर करून त्यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या सजेचे समर्थन केले आहे. सरताझ अझिझ म्हणाले की, जाधव यांच्या विरोधात पाकिस्तान सरकारकडे ठोस पुरावे आहेत. या चार्जशीटमध्ये जाधव यांच्याविरोधात चालवण्यात आलेल्या खटल्याचा कालावधीही सांगण्यात आला. याशिवाय बाजू मांडण्यासाठी जाधव यांना वकीलही देण्यात आला होता, असा दावा पाकिस्तानने केला आहे. न्यायालयात जाधव यांच्या उपस्थित सर्व साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. याशिवाय साक्षीदारांना प्रश्न विचारण्याची परवानगी जाधव यांना दिली होती, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
कुलभूषण जाधव यांनी बलुचिस्तानमध्ये अनेक धमाके घडवून आणल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. भारतीय उच्चायुक्त गौतम बंबवाले यांनी जाधव प्रकरणात चार्जशीट आणि फाशीची सजा सुनावण्याच्या निर्णयाची प्रमाणीत प्रत मागितली होती. हेरगिरीचे प्रकरण असल्याचे सांगून पाकिस्तानने जाधव यांना राजनैतिक मदत देण्याचा भारताचा आग्रह नाकारला आहे. जाधव यांच्या फाशीच्या सजेचा विरोध म्हणून भारताने पाकिस्तानशी होणार्या सर्व प्रकारच्या द्विपक्षीय बैठकी रद्द केल्या आहेत.
कुलभूषण प्रकरणात पाक लष्कराने नवाज शरीफांना ठेवले अंधारात
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावरील कारवाईबाबत पाकिस्तानच्या लष्कराने पंतप्रधान नवाज शरीफ यांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती, अशी धक्कादायक माहिती आता उजेडात आली आहे. पाक लष्कराने जाधव यांच्या फाशीचा निर्णय परस्पर घेतल्याचे उघडकीस आले आहे. यावरून पाकिस्तान अजूनही राजसत्तेवर लष्कराचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाक लष्कराने प्रचंड गुप्तता बाळगत कुलभूषण जाधव यांच्याविरोधात रावळपिंडीतील लष्करी कोर्टात कारवाई केली. या कारवाईची माहिती नवाज शरीफ सरकारलाही दिली गेली नाही. औपचारिकता म्हणून शिक्षेचा निर्णय झाल्यानंतर नवाज शरीफ यांचे सुरक्षा सल्लागार सरताज अझिज यांना पाक लष्कराने याबाबत कळवले. त्यातही पाक लष्कराने अझिझ यांचा वापर शरीफ यांना संदेश पोहोचावा यासाठी केला.
कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचा आरोप करून त्यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारताने पाकशी कुठल्याही पातळीवर चर्चा न करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकशी अनिश्चित काळासाठी सर्व चर्चा रोखण्यात आल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.सागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर येत्या सोमवारी म्हणजे 17 एप्रिला दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक होणार आहे. पण भारताने चर्चा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे या बैठकीचेही भवितव्य अंधारात आहे.
कोण आहे रॅम्बो?
रॅम्बो ही हॉलिवुडपटाची मालिका आहे. ही चित्रपट मालिका डेव्हिड मॉरेल यांच्या फर्स्ट बल्ड या कादंबरीवर आधारीत आहे. ज्येेष्ठ अभिनेता सिल्वेस्टर स्टॅलिन याने त्यात रॅम्बोचे पात्र साकारले आहे. त्यात रॅम्बो हा अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसचा माजी सैनिक असतो. व्हिएतनामच्या लढाईत सहभागी झालेला रॅम्बो वन मॅन आर्मीप्रमाणे कामे करत विध्वंसक कारनामे पूर्णत्वास नेत असतो.
‘रॉ’चे आणखी तीन हेर?
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताची गुप्तचर संघटना रिसर्च अॅण्ड अॅनॅलिसेस विंगचे तीन संशयित हेर पकडल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पोलीस ठाण्यात स्फोट घडवणे आणि देशविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानमधील दी डॉन या वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. रवालाकोट इथे संशयितांचे चेहरे झाकून पोलिसांनी त्यांना माध्यमांसमोर आणले. मोहम्मद खलील, इम्तियाज आणि रशिद अशी त्यांची नावे आहेत. हे तिघे अब्बासपूरमधील टरोटी गावचे राहणारे आहेत, असे पाक पोलिसांचे
म्हणणे आहे.
– ग्वादर, तुरबत येथे झालेल्या हल्ल्यांसाठी मदत करणे
– जिवानी बंदरात असलेल्या बिनलष्करी बोट आणि रडार स्टेशनवर हल्ला करणे.
– बलुचिस्तानमधील पाकिस्तानी युवकांना भडकवण्यासाठी फुटीरतावादी आणि अतिरेक्यांना आर्थिक मदत केली
– बलुचिस्तानमधील सुइ भागात गॅस पाइपलाइनमध्ये स्फोट घडवले.
– 2015 मध्ये क्वेटा येथे झालेल्या धमाक्यांसाठी मदत केली. या धमाक्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तीय हानी झाली
– क्वेटामधील हजरास आणि शियापंथीयांवर हल्ले केले.
– सन 2014-15मध्ये तुरबत, पंजगुर, ग्वादर, पसनी आणि जीवानीमध्ये विरोधकांच्या मदतीने हल्ले केले. त्यात अनेक नागरिक आणि सैनिक मारले गेेले आणि कित्येक जखमी झाले.