नववर्षात अमेरिकेने पाकिस्तानला जोरदार दणका दिला आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणारी 1628 कोटी रुपयांची मदत रोखण्यात आली आहे. पाकिस्तानविरोधात अमेरिकेने केलेली ही अलीकडची सर्वात मोठी कारवाई आहे. पाकिस्तानने धोका दिला, आता आर्थिक मदत नाही, अशा शब्दांत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बरसले. पाकिस्तान बर्याच काळापासून तालिबान आणि अन्य दहशतवादी संघटनांना सुरक्षित आश्रय देत आहे. यावरून ट्रम्प यांनी पाकिस्तानला इशारा देताना म्हटले आहे की, पाकिस्तानला अमेरिकेसोबतच्या सहकार्यातून बरेच काही मिळणार आहे. मात्र, गुन्हेगार आणि दहशतवाद्यांना साथ दिल्यास ते बरेच काही गमावू शकतात.
भारत आणि अफगाणिस्तान या शेजारी देशांविरोधात पाकिस्तानाच्या भूमिकेबाबतही ट्रम्प यांनी पाकिस्तानला खडसावले आहे. पाकिस्तानने तालिबान्यांना आणि दहशतवाद्यांना आपल्या भूमीवर आश्रय देऊ नये. त्याचबरोबर दहशतवादी कारवायांसाठी टेरर फंडिंग बंद करावे, असा इशारा अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे. सोनारानेच कान उपटले ते एका अर्थाने योग्यच झाले. अमेरिकेला ही उपरती अर्थातच एकाएकी झालेली नाही. पाकिस्तानची अमेरिकेला वाटणारी गरज आता संपली आहे. इस्लामी दहशतवादापेक्षाही सद्यःस्थितीत चीन व उत्तर कोरियाचे नवे आव्हान जगासमोर उभे ठाकले आहे. पाकिस्तानपेक्षा भारताची गरज अमेरिकेला मोठी आहे. त्यातच भारतातील व्यापारी संधीचेही अमेरिकेला मोठे आकर्षण आहे. अमेरिकेने बदललेल्या भूमिकेमुळे इतके दिवस त्या जीवावर उड्या मारणार्या पाकिस्तानची जबरदस्त आर्थिक कोंडी होणार आहे. अर्थात आजवर ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवादाला खतपाणी घातल्याबद्दल केवळ धमक्याच दिल्या आहेत. दहशतवादाविरोधात अमेरिकेकडून अद्याप कुठलीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. याबाबत अमेरिका केवळ अफगाण रणनीतीची आठवणच करून देते, असेही काहींना वाटते आहे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ट्रम्प यांनी आजवर अमेरिकेच्या कोणाही राष्ट्राध्यक्षाने वापरली नाही अशी कडक भाषा वापरत पाकिस्तानला सज्जड इशारा देणारे ट्वीट केले. गेल्या 15 वर्षांत अमेरिकेने मूर्खपणे पाकिस्तानला 2 लाख कोटींपेक्षा जास्त मदत पुरवली. बदल्यात फक्त खोटारडेपणा आणि कपटाशिवाय काहीच मिळाले नाही. आम्ही अफगाणिस्तानात ज्या अतिरेक्यांना शोधत होतो, पाकिस्तान त्यांना आपल्या घरात आश्रय देत होते, आता अजून मदत नाही, अशा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्वीटने जगभर खळबळ माजवून दिली. पाकिस्तानवर टीका करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची ही काही पहिलीच वेळ नाही. दहशतवाद संपवण्याच्या दृष्टीने पाकिस्तानने आणखी कठोर पावले उचलावीत, असा दबाव आपण टाकायला हवा, असे ट्रम्प यांनी यापूर्वी म्हटले होते. अमेरिकेने 26/11चा मास्टरमाइंड हाफिज सईदला दहशतवादी घोषित केले होते. याशिवाय त्याच्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत या संघटनांनाही दहशतवादी संघटनेच्या श्रेणीत ठेवले. काही दिवसांपूर्वी हाफिजची नजरकैदेतून पाकिस्तानने सुटका केली होती. हाफिजला नजरकैदेतून मुक्त केल्यानंतर भारताने याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अमेरिकेनेही पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत खडसावले होते. हाफिजला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेने सातत्याने पाकिस्तानवर दबाव टाकला होता. भारत आणि आंतरराष्ट्रीय दबावापुढे पाकिस्तानाला अखेर नरमाईची भूमिका घेणे भाग पडले होते. सध्या पाकिस्तानने हाफिज सईदच्या संघटना जमात-उद-दावाला मिळणार्या आर्थिक देणग्यांवर बंदी घातली आहे तसेच हाफिजची आणखी एक संघटना फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशनच्या फडिंगवरही पाकने बंदी घातली आहे. सेक्युरिटी ऑफ पाकिस्तानने याबाबतचा एक अध्यादेश काढून याची माहिती जगाला दिली होती.
अमेरिकेने दक्षिण आशियाबद्दलचे धोरण स्पष्ट केल्यापासूनच अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात काही प्रमाणात वितुष्ट आले आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याने पाकिस्तानातील आगामी निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यानंतरही ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली होती. पाकिस्तान हा गोंधळ, हिंसा आणि दहशतवाद पसरवणार्यांचा आश्रयदाता असल्याचे ट्वीट ट्रम्प यांनी त्यावेळी केले होते. सईद याने निवडणूक लढवल्यास त्याच्यावरील दहशतवादी हा शिक्का पुसला जाईल, अशी पाकिस्तानची छुपी भूमिका आहे. मात्र, ट्रम्प यांनी याबद्दल पाकिस्तानला इशारा देताना सईद हा संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला दहशतवादी असून अमेरिकेने त्याच्या डोक्यावर इनाम ठेवल्याची आठवण करून दिली आहे. पाकिस्तानी भूमीत वावरणार्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी अमेरिकेने दबाव वाढवला असला तरी चीन आणि सौदी अरेबिया या आश्रयदात्यांकडून आपल्याला भरपूर मदत मिळेल. त्यामुळे अमेरिकेचा दबाव झुगारून देता येईल, असे पाकिस्तानला वाटते. ट्रम्प प्रशासन पाकिस्तानची 255 दशलक्ष डॉलर्सची मदत रोखण्याच्या विचारात असल्याची माहिती अमेरिकेच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी नुकतीच फोडली होती. ट्रम्प यांनी ट्विटरवरून उपस्थित केलेल्या मुद्द्यावर आम्ही लवकरच भूमिका स्पष्ट करू. सत्य आणि काल्पनिक गोष्टींमधील फरक जगासमोर आणू, असे ट्वीट पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केले. दहशतवाद संपवण्याच्या दृष्टीने अमेरिकेचा साथीदार म्हणून पाकिस्तानने अमेरिकेला आपली जमीन आणि हवाई हद्द वापरू दिली. आमच्या सीमेपलीकडे राहणार्या दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी नागरिक ठार केले जातात, या बाबीकडे अमेरिका दुर्लक्ष करत आहे. अशा शब्दात पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने उलट कांगावा सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला मिळणार्या मदतीवरुन अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्समधूनही एक वृत्त प्रकाशित झाले होते. या वृत्तानंतर अमेरिकेच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. दुसरीकडे पाकिस्तान सरकारने कराचीमधील अमेरिकी राजदूत डेव्हिड हेल यांना बोलावून घेतले आणि ट्रम्प यांच्या ट्वीटविरोधात आपला विरोध दर्शवला. तर, पाकिस्तान सरकारकडून आपल्यावर होणार्या कारवाईमुळे हाफिज सईद चांगलाच संतापला आहे. त्याने या कारवाईचे खापर भारतावर फोडले आहे.