मुंबई । नोटाबंदीमुळे बनावट चलनाला आळा बसणार असल्याचा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता. मात्र आता ही बाब फोल ठरली असल्याचे दिसून आले आहे. पाकिस्तानातून दोन हजार रूपयांच्या बनावट नोटा भारतात बांगलादेशमर्गे दाखल होत असल्याचे एनआयए व बीएसएफने केलेल्या कारवाईतून उघड झाले आहे. यामुळे नोटाबंदीचा मूळ उद्देश असफल ठरल्याचे दिसून येत आहे.
आयएसआयकडून छपाई
नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिस इंटेलिजन्सकडून (आयएसआय) बनावट नोटा छापण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याची माहिती आधीच समोर आली असतांना 8 फेब्रुवारीला मुर्शिदाबाद येथून अझिझूर रेहमान याला ताब्यात घेण्यात आले होते. अझिझूर रेहमान हा मुळचा पश्चिम बंगालमधील मालदा येथील रहिवासी आहे. त्याच्याकडे दोन हजार रूपयांच्या 40 बनावट नोटा सापडल्या होत्या. चौकशीदरम्यान त्याने या नोटा पाकिस्तानात छापण्यात आल्याची कबुली दिली होती. याशिवाय, आपण बांगलादेशच्या सीमेवरून तस्करी करून या नोटा भारतामध्ये आणल्याचेही सांगितले होते.
अल्पदरात विक्री
दरम्यान, अझिझूर रेहमान याच्या चौकशीत बनावट नोटांबद्दलची आणखी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दोन हजार रूपयांच्या बनावट नोटांची छपाई आणि दर्जानुसार तस्करांकडून 400 ते 600 रूपयांच्या दरम्यान या नोटांची खरेदी केली जाते. याशिवाय, नव्या नोटांमधील 17 पैकी 11 सुरक्षा वैशिष्ट्यांची तंतोतंत नक्कल करण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामध्ये नोटेवरील पारदर्शक भाग, वॉटरमार्क, अशोक चिन्ह, नोटेच्या डाव्या बाजूस छापण्यात आलेला मजकूर, गव्हर्नरांच्या स्वाक्षरीसह असणारे हमीपत्र आणि नोटीचे मूल्य दर्शविणारी देवनागरीतील अंक यांचा समावेश आहे. याशिवाय, नोटेच्या मागच्या बाजूस असणारे चांद्रयानाचे चिन्ह आणि स्वच्छ भारतचे बोधचिन्ह या वैशिष्ट्यांचाही बनावट नोटेवर तंतोतंत नक्कल करण्यात आली आहे.