पाकिस्तानातील अंतर्गत व्यवस्थेकडे अमेरिकेसह भारत, चीनचेही लक्ष असते. धर्माच्या नावावर चालणार्या राष्ट्रांमध्ये सुख-समृद्धी-शांती अखंड नांदते हे पाकिस्तानने इतर धर्मवेड्या देशांप्रमाणेच खोटे ठरवले आहे. या देशात जनतेने निवडून दिलेले सरकार, लष्कर आणि आयएसआय यांनी पाकिस्तानची जनता अखंड वेठीस धरलेली असते. पाकिस्तानच्या अंतर्गत व्यवहारांकडे पाहावेच लागते. कारण तालिबान, लश्कर ए तोयबासारख्या दहशतवादी संघटनांसाठी हा देश माहेरघर आहे. नुकतेच पनामा प्रकरणात पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानी न्यायालयाने दोषी धरले आहे. पाकिस्तानात लोकनियुक्त सरकार कार्यकाल पुरा करेल की नाही हीच भीती क्षणाक्षणाला असते. शरीफ यांनी निकालानंतर राजीनामा दिला. त्यामुळे पंतप्रधानपदाचा कार्यकालही अपूर्णच राहिला. लोकनियुक्त सरकारला मात्र आता तरी धोका दिसत नाही. नाही तर लष्कर आणि आयएसआय सरकार टिकूच देत नाही.
नवाझ शरीफ यांचा उदय 1980 च्या दशकात झाला. लष्करशहा जनरल झिया उल हक सरकारने बेनझिर भुत्तो यांना पर्याय म्हणून शरीफ यांना पुढे आणले. पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री ते पाकिस्तानचा पंतप्रधान असा शरीफ यांचा प्रवास लष्कराच्या मदतीनेच झाला. त्यात शरीफ व कुटुंबीयांच्या व्यवसायातील संपत्तीही वेगाने वाढली. अखेर पनामा प्रकरणात ते सापडलेच. शरीफ यांचा उदय लष्कराच्या सहकार्याने झाला. त्यांना हा इतिहास पुसून जनतेचा पाठिंबा हवा होता. लष्कराने शरीफ यांच्या मागील कार्यकालात त्यांची सत्ता घालवली होती. हे त्यांच्या स्मरणात होते. त्यामुळे आताही त्यांच्या पंतप्रधान म्हणून तिसर्या कार्यकालात त्यांचे लष्कराशी सतत खटके उडत होते. शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग हा पक्ष आहे. लष्कराशी पंगा घेऊन त्यांनी हा पक्ष जनतेत रुजवला. पंजाबमधून त्यांना चांगलाच पाठिंबा मिळाला.
हा निकाल घातपात किंवा कट नव्हता. घटनेच्या चौकटीत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने न्यायप्रक्रियेच्या अधीन राहून शरीफ यांना झटका दिला आहे. ही साधीसुधी घटना नाही. कारण पाकिस्तानातील 30 वर्षांहून अधिक काळ सत्तेत असलेल्या सर्वात सामर्थ्यशाली राजकीय घराण्याविरोधात हा निकाल आहे. पाकिस्तानात विद्यमान प्रधानमंत्र्यांना न्यायालयाच्या निकालामुळे पायउतार व्हावे लागते, ही घटना लोकशाहीसाठी आशादायक असली, तरी या घडीला पाकिस्तानात काय खदखद आहे ते सांगता येणार नाही. पाकिस्तानचे पाऊल लोकशाही राजकीय प्रक्रियेकडे पडणे ही आपल्यासाठी समाधानाची बाब यासाठी असते की तेथील अंतर्गत अव्यवस्था काश्मीरमधील दहशतवादी उच्छादालाच नव्हे, तर जगात इतरत्रही दहशतवादास कारणीभूत ठरते. रशियातील फुटीरतावादी चेचनिया राज्यातही पाकिस्तानातील दहशतवादी सापडले होते.
शाहबाज शरीफ यांच्याकडेच सत्तेची सूत्रे नवाझ शरीफ यांनी सोपवली असल्याने सध्या तरी राजकीय घराण्याचीच सत्ता पाकिस्तानवर आहे. त्यामुळे राजकीय घराण्याची सद्दी संपली असे या घडीला म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. पाकिस्तानात न्यायालयाच्या निर्णयामुळे तीव्र राजकीय ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या राजकारणात सिंध आणि विशेषतः पंजाब प्रांतांचेच महत्त्व आहे. पंजाबी म्हणून शरीफ यांच्यासाठी हा न्याय आणि सिंधमधील नेत्यांसाठी वेगळा असा समज पाकिस्तानात पसरलेला होता. पंजाबमधील शरीफ यांच्याविरोधातील न्यायनिर्णयामुळे या समजुतीला तडा गेला आहे.
शरीफ यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांवरही न्यायालयाने ठपका ठेवत त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली चौकशीच्या बडग्याखाली ठेवलेले आहे. शरीफ घराण्याची कुणीही व्यक्ती सत्ता चालवण्यासाठी कायद्याने सक्षम राहणार नाही, असा हा निकाल आहे. मुलगी मरियम हिचे नाव अपेक्षित असले, तरी आरोपींच्या यादीत शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांचे नाव अनपेक्षित होते. पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) या पक्षाची अवस्था गोंधळाची झाली आहे. मुशर्रफ यांनी केलेल्या बंडाच्या वेळी पक्षातून फुटलेले लोक नंतर पुन्हा या पक्षात आले आणि ते आता कॅबिनेटमध्येही आहेत. शरीफ यांच्यानंतर येणार्या नेत्याला या धोकादायक सहकार्यांशी सामना करावा लागणार आहे. शरीफ हे राजकीय बळी आहेत असा प्रचार करून जनतेची सहानुभूती मिळवणे तितकेसे सोपे नाही. शरीफ यांचा पंजाबचा गड कायम राहण्यावर पुढील राजकीय घडामोडी अवलंबून आहेत. शरीफ पुन्हा सत्तेत येणे कठीण आहे आणि त्यांच्या कुटुंबाचा सत्तेतील प्रभाव आणि सहभाग कितपत राहील हे सांगणे कठीण आहे.
सचिन पाटील – 9423893536