कराची । शहरयार खान यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर पुन्हा एकदा मॅच फिक्सींगचे भूत बसले आहे. जंग या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या गुरुवारी पाक क्रिकेट बोर्डाच्या तीन सदस्यीय भ्रष्टाचारविरोधी समितीसोबत झालेल्या बैठकीत ब्रिटनच्या राष्ट्रीय गुन्हे विभागाच्या अधिकार्यानी फलंदाज उमर अकमल आणि जलद गोलंदाज मोहम्मद सामीचे नाव वारंवार घेतल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटू संशयाच्या भोवर्यात सापडले आहेत.
सट्टेबाज मोहम्मद युसुफने फिक्सिंग प्रकरणात उमर आणि सामीचे नाव घेतले असल्याचा खुलासा ब्रिटनच्या तपास अधिकार्यांनी केला आहे. दरम्यान उमर अकमल आणि सामीने पाक क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केले असल्याचे स्पष्ट झाल्याशिवाय या दोघांना नोटीस पाठवता येणार नसल्याचे बोर्डाच्या अधिकार्यांनी सांगितले. फिटनेसमध्ये नापास झाल्यामुळे अकमलला सघातून काढण्यात आले. त्यामुळे तो वेस्टइंडिज आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकला नव्हता. सामी मार्च 2016 पासून संघाच्या बाहेर आहे. मोहालीत टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामी शेवटचा सामना खेळला होता.
मोहम्मद इरफानवर बंदी
पीएसएलमध्ये स्पॉटफिक्सिंग केल्याची तक्रार आल्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानवर एक वर्षाची बंदी आणि 10 लाख रुपये दंडाची कारवाई केली. बुकीने दिलेली ऑफर बोर्डाला न कळवल्यामुळे इरफानवर ही कारवाई केली. बंदीच्या कारवाईची दोन टप्प्यांत अंमलबजावणी होणार आहे. बंदीचा पहिला टप्पा सहा महिन्यांचा असणार आहे.