पाकिस्तान हा भारताचा उलट्या काळजाचा शेजारी आहे. कायम वाकडे असलेले हे शेपूट कधीही सरळ होणे नाही. परवाच्या कुलभूषण यांच्या कुटुंबीयांच्या भेटीने ही बाब अधोरेखित झाली. कुलभूषण जाधव हे त्यांचे फाशीच्या शिक्षेचे कैदी असले तरी, ते कुणाचे तरी पुत्र अन् पती आहेत, याचे तरी भान या निष्ठूर देशाने बाळगायला हवे होते. या भेटीच्या अनुषंगाने कारणमीमांसा आता उच्चस्तरावर सुरुच होईल, परंतु भारतासह जगाने जे पाहिले त्यामुळे पाकिस्तान हा देश सर्वांच्या नजरेतून उतरला आहे.
भारताचे माजी नौदल अधिकारी व सद्या सेवानिवृत्तीचे जीवन जगणारे व्यावसायिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली. या अटकेतून पाकिस्तानला जे सिद्ध करायचे आहे, ते कदापिही सिद्ध करू शकणार नाहीत. परंतु, एक व्यक्ती म्हणून ते कुलभूषण यांचा अतोनात छळ करत आहेत. त्यांचा हा सुरु असलेला छळ भारतीयांच्या वेदना वाढविणारा आहे. इराणमध्ये एका बैठकीसाठी गेलेल्या जाधवांना पाकिस्तानी लष्कराच्या हेरखात्याने अटक केली. त्यांच्यावर बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानविरोधी कारवाया करण्याचा आरोप लावला. गेली 22 महिने ते पाकिस्तानच्या अगदी अनाधिकाराने ताब्यात आहेत. भारतीय नागरिकाला अशाप्रकारे ताब्यात ठेवण्याचा व त्याचा शारीरिक व मानसिक छळ करण्याचा अधिकार पाकिस्तानला अजिबात नाही, तरीही हे छळसत्र सुरु आहे. परवा पाकिस्तानचे संस्थापक बॅ. मोहम्मदअली जीना यांचा जन्मदिन तिकडे जोरात साजरा झाला. या जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर जाधव यांच्या कुटुंबीयांना भेटू देत असल्याचे सांगून, त्यांनी ते किती मानवतावादी, दयाबुद्धीचे आहेत, असे प्रदर्शन मांडले होते. आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार खात्याच्या प्रवक्त्यांचे वक्तव्य पाहिले असता, कुलभूषण यांना त्यांच्या पत्नी व आईची भेट घडवून देणे म्हणजे मोठेच मानवतावादी कार्य पाकिस्तानने केले, असा धिंडोरा ते पिटवित होते. खरे तर या भेटीच्या छायाचित्रांतून पाकिस्तानचा क्रूर चेहराच उघडा पडला. कुलभूषण यांचा अनन्वित छळ करण्यात येत असल्याचे त्यांच्या शरीरावरून दिसून आले. त्यांच्या कवटीचे हाड वाढलेले दिसले तसेच त्यांच्या कानालाही व्रण आढळून आलेत, पाकिस्तानातून आलेली छायाचित्रे आता भारतीय गुप्तचर यंत्रणा, परराष्ट्र खाते आणि भारतीय लष्कराकडून तपासली जात आहेत. या छायाचित्रांच्याआधारे कुलभूषण यांच्या शारीरिक, मानसिक स्थितीचे वैद्यकीय विश्लेषण भारतीय यंत्रणा करतीलच; परंतु या भेटीने ते जीवंत आहेत, असे तूर्त तरी समजायला हरकत नाही.
मुळात पाकिस्तान हा लबाड, आणि विश्वासघातकी देश आहे. कुलभूषण यांच्या कुटुंबीयांना त्यांनी काचेच्या पडद्याआड भेटविले, याचाच अर्थ जे भेटले ते तरी कुलभूषण होते की त्यांच्यासारखा दिसणारा भलताच व्यक्ती होता, हेही संशयास्पद आहे. त्यामुळे कुलभूषण यांना यापूर्वीच मारून टाकलेले असावे व आता कुणी तरी विंगेतील नटाला कुलभूषण म्हणून सादर केले गेले असावे, असा एक तर्क जो गुप्तचर यंत्रणा व्यक्त करत आहेत, तोही खरा वाटावा, अशी परिस्थिती आहे. या भेटीचे कवित्व आता सुरु होईल, कालच एका वृत्तपत्राने ही भेट पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या कार्यालयात नव्हे तर एका शिपिंग कंटेनरमध्ये घडवून आणली गेली होती, असा दावा केला आहे. खरे काय अन् खोटे काय ते काही कळत नाही, अशी गोंधळाची स्थिती आहे. परंतु, या सर्व घडामोडीवरून एक बाब प्राकर्षाने जाणवते, पाकिस्तानने एका निरपराध भारतीय नागरिकाला पकडले असून, त्याची सुटका करण्याची जबाबदारी भारताची आहे. त्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण करावा लागणार आहे. पाकिस्तान हा जगातील एकमेव असा देश आहे, ज्याचे शेपूट कुत्र्यासारखे वाकडे आहे, ते कधीही सरळ होण्याची सुतराम शक्यता नाही. या देशाशी सामोपचारिक बोलणी केली गेली, त्यांच्यासोबत युद्धही करून झाले, या प्रत्येक युद्धात त्यांचा अपमानास्पद पराभव झालेला आहे. एवढेच काय आशिया खंडात या राष्ट्राला अगदी एकटेही पाडून झाले तरी भारतद्वेषाची मानसिकता त्यांची काही बदलत नाही. तिकडे पाकिस्तानात जाधव कुटुंबीय कुलभूषण यांना भेटत असताना इतके आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरु होता. त्यात दोन्ही बाजूंचे तीन-चार सैनिक ठार झाले आहेत. या गोळीबाराने सीमारेषा पुन्हा एकवेळ धगधगू लागली आहे. भारतासारख्या शांतताप्रिय शेजारी राष्ट्राशी शांततापूर्ण सहजीवन ते का जगू शकत नाहीत? हाच मोठा यक्ष प्रश्न आहे. कुलभूषणप्रश्नी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली, त्यांच्या सुटकेसाठी भारत अटोकाट प्रयत्न करत आहे, या प्रयत्नांना नक्कीच यश प्राप्त होईल, अशी अपेक्षा ठेवू या.
कुलभूषण हे खरोखर हेर होते की नाही, हे सांगता येणे कठीण असले तरी हेरगिरीच्या विश्वात ज्याक्षणी पकडले जाते तो क्षण अंतिम समजायचा असतो. हेरगिरी हे एक असे क्षेत्र आहे, ज्या क्षेत्रात मरण तळहातावर घेऊनच काम करावे लागते. जगातील प्रत्येक देश हेरगिरी करतो; परंतु पकडल्या जाणार्या हेराची जबाबदारी कुणीही स्वीकारत नसतात. पाकिस्तानच्या अनेक हेरांना भारतानेही असेच टिपले होते. तसेच, भारताच्याही पाकमधील हेरांना त्यांनीही टिपलेलेच आहे. हेरगिरीचे काम जोपर्यंत सुरु आहे, तोपर्यंत अशाप्रकारे बळी जातच राहणार. कुलभूषण हे जर देशाचे हेर असतील तर त्यांचा भारताला नक्कीच अभिमान आहे. शेवटी अशा प्रकारे शहीद होणार्या हेरांच्या जीवावरच कोणतेही राष्ट्र सक्षमपणे शत्रूंच्याविरोधात उभे राहू शकते. हेरगिरी व पाकविरोधी कृत्यांसाठी कुलभूषण यांना पाकिस्तानी लष्कराने फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे. त्यामुळे आज तरी कुलभूषण यांच्या गळ्याभोवती फाशीचा फास आवळला गेलेला दिसतो. उद्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भरभक्कम ठरली तर या फाशीच्या शिक्षेतूनही त्यांची नक्कीच सुटका करता येईल. तसेच, त्यांच्या मायदेशी परतण्याचा मार्गही मोकळा होईल. काळाच्या ओघात काही बाबी स्पष्ट होतीलच; परंतु परवाच्या जाधव कुटुंबीयांच्या कुलभूषण भेटीने पाकिस्तान किती उलट्या काळजाचा आहे, हे जगाला दिसले. कुलभूषण कैदी असले तरी ते कुणाचे तरी पुत्र आहेत, कुणाचे तरी पती होतं, त्याचे तरी भान पाकिस्तानने ठेवायला हवे होते.