पाकिस्तान सैन्यांच्या गोळीबारात ४ जवान शहीद

0

श्रीनगर-सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असून बुधवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याने सीमा रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. यात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) चार जवान शहीद झाले.तर तीन जवान यात गंभीर जखमी झाले आहेत.

मंगळवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने सीमा रेषेवरील सांबा जिल्ह्यातील रामगढ आणि चंबलीयाल या भागांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याने या भागांमध्ये भारतीय चौक्यांना लक्ष्य केले. बुधवारी पहाटेपर्यंत पाकिस्तानकडून गोळीबार सुरुच होता. चंबलीयाल येथे बीएसएफचे चार जवान पाकच्या गोळीबारात शहीद झाले. तर तीन जवान जखमी झाले. दुसरीकडे पाकिस्तानने भारतावर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा कांगावा केला आहे.

मंगळवारी भारताच्या गोळीबारात पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाल्याचे पाकमधील माध्यमांनी म्हटले आहे. गेल्या सहा महिन्यात भारताच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात २२ नागरिकांना जीव गमवावा लागला, असे तेथील माध्यमांनी म्हटले आहे.