वॉशिंग्टन । पाक दहशतवादी काही दिवसांत भारत आणि अफगाणिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने दिली आहे. दहशतवाद्यांवर नियंत्रण मिळवण्यात पाकिस्तान अपयशी ठरले असल्याचे राष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे संचालक डॅनियल कोट्स यांनी म्हटले आहे. कोट्स यांनी अमेरिकेच्या गुप्तचर समितीबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान ही माहिती दिली.
अमेरिकेसाठीही डोकेदुखी
या दहशतवादी संघटना अमेरिकेसाठीही डोकेदुखी ठरत आहेत. ते सातत्याने भारत आणि अफगाणिस्तानवर हल्ला करण्याची योजना बनवत आहेत. पाकिस्तानही अणवस्त्रांची संख्या वाढवत असून अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या आकलनानुसार पुढील वर्षी अफगाणिस्तानमधील राजकीय परिस्थिती आणखी चिघळेल. हे ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे होईल. बाहेरच्या मदतीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अफगाणिस्तान जोपर्यंत संघर्ष करेल तोपर्यंत ते दहशतवादावर नियंत्रण मिळवू शकणार नाहीत किंवा तालिबानबरोबर ठोस समजोत्यापर्यंत जाऊ शकणार नाहीत, असेही डॅनियल कोट्स म्हणाले.
चीनचा हस्तक्षेप वाढेल
तालिबान ग्रामीण भागात प्रभावासाठी प्रयत्न करेल. अफगाणी सुरक्षा यंत्रणांची अवस्था बिकट होईल. तालिबानविरोधात सुरू असलेले ऑपरेशन, चकमकीत जात असलेले बळी, कुचकामी नेतृत्व आणि साहित्याची टंचाई हे यामागचे मुख्य कारण असू शकते, असे कोट्स म्हणाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान एकटे पडले आहे. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत असलेली चांगली प्रतिमा, अमेरिकेबरोबर दृढ संबंधामुळे पाकिस्तानमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या परिस्थितीशी निपटण्यासाठी ते चीनकडे वळू शकतात. त्यामुळे चीनचा हिंद महासागरात हस्तक्षेप वाढेल, असे कोट्स म्हणाले.भारताबरोबरील बिघडत्या संबंधास पाकिस्तान दोषी असल्याचे कोट्स यांनी सांगितले. सीमेपलीकडून मोठा हल्ला झाला तर संबंधात आणखी वितुष्ठ निर्माण होऊ शकते. तालिबान्यांचा प्रभाव पाकिस्तानातही आहे. लष्कराचेही पाक सरकारवर सतत वर्चस्व असते. त्यामुळे परिस्थिती चिघळू शकते, असे ते म्हणाले.