जळगाव : सामाईक बांधावर बैलांचा पाय लागल्याच्या कारणावरून नगरदेवळा येथील भास्कर कासेटी यांच्या कुटुंबियांना गाठून लाठयाकाठयासह कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी पाचही आरोपींना जिल्हा न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली.
फिर्यादीवरून याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला रमेश मांडोले, सुभाष मांडोले,पंकज मांडोले, सुनील मांडोले, मालुबाई (सर्व रा.नगरदेवळा) यांच्यावर भादवी कलम 307,326,325,447,147,148,149 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी प्रभाकर जाधव यांनी गुन्हयाचा तपास करून कोर्टात दोषारोपपत्र सादर केले होते.
खटल्याच्या चौकशीचे कामकाज प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम.ए.लव्हेकर यांच्या न्यायालयात चालले. सरकार पक्षातर्फे एकुण 14 साक्षीदार तपासण्यात आले.त्यात जखमी ,वैद्यकीय अधिकारी व तपासाधिकारी वगळता सर्व साक्षीदार फितुर झाले. सरकार पक्षाचा युक्तीवाद तसेच पुराव्यावरून कोर्टाने सर्व संशयीताना दोषी ठरवित शिक्षा सुनावली. त्यात भादवी कलम 325 नुसार एक वर्ष शिक्षा व प्रत्येकी 300 रूपये दंड, कलम 447 नुसार 03 महिने शिक्षा व प्रत्येकी 300 रूपये दंड, कलम 147 नुसार 03 महिने शिक्षा व प्रत्येकी 300 रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. संभाजी जाधव व अॅड. प्रदिप महाजन यांनी तर आरोपीतर्फे अॅड. पंकज अत्रे यांनी काम पाहिले.