जळगाव। दुकानाच्या भाडे कराची मुदत संपल्यानंतरही भाडेकरूने जागा रिकामी करून न देता वकिलामार्फत नोटीस पाठवून 6 लाखांसह जागा बळकावयाचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे मानसिक ताण वाढल्याने 65 वर्षीय वृद्ध रमेश विभांडिक यांनी आत्महत्या केली होती. या घटनेतील पाच संशयिताच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी न्यायाधीश आर.जे.कटारीया यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यात पाचही संशयितांचे अर्ज फेटाळण्यात आले.
यांच्याविरूध्द आहे गुन्हा दाखल
विभांडिक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अरुण कस्तुरे, बंटी कस्तुरे, मॉनटी कस्तुरे, रमेशचंद्र पुरोहीत व नंदकिशोर जोशी यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व संशयितांना अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. सोमवारी त्यावर न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयाने पाचही संशयितांचे अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळले. सरकार पक्षातर्फे अॅड.केतन ढाके यांनी काम पाहिले. दरम्यान, संशयितांनी शहरातील आणखी काही ठिकाणी अशा प्रकारे मालमत्ता बळकावल्या असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच मयत विभांडिक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत ही तसा उल्लेख करण्यात आला आहे. ही माहिती सरकार पक्ष व पोलिसांनी न्यायालयात युक्तीवादात दिली होती. त्यानुसार न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहे.