पाचोरा तहसीलदारांवर दगडफेक करीत वाळू माफियांनी लांबवले ट्रॅक्टर

0

उत्राण जवळील गिरणा पात्रातील घटना ; पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल

पाचोरा- अवैधरीत्या वाळूची वाहतूक थांबवण्यासाठी गेलेल्या पाचोरा तहसीलदारांसह तलाठ्यांवरच वाळॅ माफियांनी नदीपात्रातील दगड-गोट्यांनी हल्ला चढवल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेनंतर वाहनासह संशयीत पसार झाले तर पाचोरा पोलिसात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पाचोरा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या निवासस्थानावर मध्यरात्री वाळू माफियाने दगडफेक केल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार उघड झाल्याने महसूल कर्मचारी धास्तावले आहेत. वाळू माफियांची मुजोरी ठेचण्यासाठी पोलीस प्रशासनाने धडक कारवाई करण्याची अपेक्षा आहे.

तहसीलदारांसह तलाठ्यांवर दगडफेक
पाचोरा तहसीलदार बी.ए.कापसे यांच्यासह चार तलाठी अवैधरीत्या वाळूची चोरी होत असल्याने उत्राण जवळच्या गिरणा नदीपात्रात मंगळवारी रात्री गेले होते. नदीपात्रात एक वाळूने भरलेला ट्रॅक्टर व एक रिकामा ट्रॅक्टर या पथकाला आढळल्यानंतर दोन तलाठी हे ट्रॅक्टर तहसीलमध्ये आणण्याच्या प्रयत्नात असतानाच 20 ते 25 जणांचा जमाव अचानक तेथे जमला व तहसीलदारांसह पथकाला एकेरी व शिवराळ भाषेत शिवीगाळ करू लागला तर काही जणांनी दोन्ही तलाठ्यांना ट्रॅक्टरवरून खाली उतरवत ट्रॅक्टर पळवून नेले तर पथकाने पाठलाग न करण्यासाठी दगड-गोठ्यांनी दगडफेकदेखील केली. या प्रकरणी तहसीलदार बी.ए.कापसे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात वाळू माफियांविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.