पाचोरा-भडगाव रोडवर रस्तालूट, रोकडसह एक लाखाचा ऐवज लंपास

0

पाचोरा– पाचोरा ते भडगाव रोडवर ऑनलाईन शॉपिंगची डिलेवरी करणाऱ्या तरुणास डोळ्यात मिरचीची पूड फेकून मारहाण करत त्याच्याजवळील 64 हजारांची रोकड व सुमारे 32 हजार रुपयांचे 9 पार्सल व मोबाईल घेऊन पोबारा केल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.

पाचोरा येथे डिलेवरी प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यालय असून चंद्रकांत पाटील हे कार्यालय प्रमुख आहेत तर येथील आठवडे बाजार बाजारात रहिवासी आशिष पटवारी ( 34) हा युवक या कार्यालयामार्फत ऑनलाइन शॉपिंगचे पार्सल डिलेवरी करण्याचे काम करतो तो शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास 40 पार्सल घेऊन भडगाव येथे गेला. त्याने 31 पार्सल देऊन ग्राहकांकडून 64 हजार 473 रूपये घेतले. ही देवाण-घेवाण त्याने भडगाव बस स्थानकावर केली व दिवसभराचे कामकाज आटोपून सायंकाळी सव्वा चार वाजेच्या सुमारास तो आपली दुचाकी (एम.एच. 19 बी ई 8811) ने पाचोऱ्याकडे निघाला बांबरूड फाटयाजवळ तितुर नदीच्या पुलावरून जात असताना त्याच्यामागून दोन मोटारसायकलवर आलेल्या सहा युवकांनी त्याला आमचेही पार्सल देवुन टाका, असे म्हणत त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु तो थांबला नाही तेव्हा त्याच्या मोटारसायकल पुढे तिघांनी आपली मोटारसायकल लावली व त्यास थांबवले. त्याच्यामागून आलेल्या मोटारसायकलवरील तिघांपैकी एकाने त्याच्या तोंडावर लाल मिरचीची पूड घेतली त्यामुळे तो भांबावला तेव्हा मोटारसायकलवरून आलेल्या युवकांपैकी दोघांनी त्यास नदी पुलाखाली सुमारे 50 फुट खोल आेढत नेले, त्यास लाथाबुक्क्यांनी व केबलने मारहाण केली व त्याच्याजवळील 64 हजार 473 रूपयांची रोकड व उरलेले 9 पार्सल किंमत सुमारे 32 हजार असा सुमारे एक लाखाचा ऐवज लंपास केला हे युवक नदीतूनच पुढे मार्गस्थ झाले जखमी झालेल्या आशिष पटवारी याने कसेतरी रस्त्यावर येऊन ये-जा करणाऱ्यांना थांबवत आपबिती सांगितली. हा प्रकार पोलिसांना कळताच पोलीस उपअधीक्षक केशव पातोंड, पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व लुटारूंचा माग काढण्याचा प्रयत्न केला.