पाचोरा : गोपनीय माहितीच्या आधारे पाचोरा शहरातून सुमारे सात लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनातर्फे झालेल्या कारवाईनंतर गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. नाशिक येथील अन्न सुरक्षा अधिकारी तथा गुप्त विभागाचे अविनाश दाभाडे आणि जळगाव येथील अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे आणि त्यांच्या सहकार्यांनी बुधवारी ही कारवाई केली.
गुटखा तस्करांच्या गोटात खळबळ
पाचोरा शहरातील सिंधी कॉलनी भागातून छोटा हत्ती (एम.एच.19 सी.वाय.0089) व मारुती ओम्नी (एम.एच.15 सी.एम.8020) मधून या वाहनांमधून बंदी घातलेला गुटखा, पानमसाल्यासह सात लाख सात हजार 195 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही वाहनांसह 10 लाख 47 हजार 195 किंमतीचा मुद्देमाल जप्त झाला असून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले.