पाचोरा : भरधाव दुचाकी डिव्हायडरवर धडकल्याने बुलढाणा जिल्ह्यासह पाचोरा शहरातील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार, 5 जुन रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात एक युवक जखमी झाला असून त्याच्यावर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उमेर सत्तार बागवान (17, हिदायत नगर, चिखली, जि.बुलढाणा), अयान खान आमीन खान (15, तकीया मुल्लावाडा, पाचोरा) अशी मयतांची नावे आहेत तर साहिल सलिम शेख (15, अक्सानगर, पाचोरा) हा जखमी झाला आहे.
स्विमींग करून परतताना गाठले मृत्यूने
रविवार, 5 जुन रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास दुचाकी (एम.एच. 20 डी.झेड.2941) ने मोंढाळा रोडवरील स्विमिंग पुलावर पोहण्यासाठी तिघेही तरुण गेले असता स्विमिंग पुलावरून परतताना शहरातील जळगाव चौफुलीजवळील साईनाथ मार्बलसमोर त्यांची दुचाकी डिव्हायडरवर जोरदार धडकली. या अपघातात उमेर सत्तार बागवान व अयान खान अमिन खान या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर साहिल सलिम शेख हा युवक जखमी झाला. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी केले. अपघात प्रकरणी पाचोरा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील व पोलिस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र नलवाडे करीत आहेत.