पाच कारखान्यांवर जप्तीचे आदेश

0

पुणे । राज्यातील पाच साखर कारखान्यांनी एफआरपीची सुमारे 264 कोटी रुपये थकविल्यामुळे संबंधितांवर जप्तीची कारवाई करुन एफआरपीची रक्कम व्याजासह देण्याचे आदेश साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी दिले आहेत. या कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तीन आणि सांगलीमधील दोन कारखान्यांचा समावेश आहे. संबंधित दोन्ही जिल्हाधिकार्‍यांनी ही कारवाई करण्याचेही आदेशात नमूद केले आहे. हंगाम 2017-18 मध्ये थकित एफआरपीप्रश्‍नी कारवाई करण्यात आलेल्या कारखान्यांमध्ये तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी (कोल्हापूर), श्री रेणुका शुगर्स संचलित देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी (कोल्हापूर), भोगावती सहकारी (कोल्हापूर) आणि महाकाली सहकारी (सांगली), माणगंगा सहकारी (सांगली) यांचा समावेश आहे.

ऊस गाळप हंगाम संपत आला असताना एफआरपीची रक्कम शेतकर्‍यांना न दिल्यामुळे संबंधित सर्व कारखान्यांच्या सुनावण्या साखर आयुक्तालयात वेळोवेळी घेण्यात आलेल्या आहेत. तरीसुध्दा शेतकर्‍यांच्या उसाच्या एफआरपीची रक्कम दिली गेली नाही. त्यामुळे संबंधित कारखान्यांकडून एफआरपी दराप्रमाणे देयबाकी असलेली रक्कम व त्यावर विहित दराने होणार्‍या व्याजाची रक्कम कारखान्यांकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस इत्यादी उत्पादनाची विक्री करुन रक्कम वसूल करण्यात यावी. तसेच आवश्यकतेप्रमाणे कारखान्याच्या स्वतःच्या जंगम व स्थावर मालमत्तेची विहित पध्दतीद्वारे विक्री करुन या रक्कमेतून ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील तरतुदीनुसार देयबाकीची रक्कम खात्री करुन संबंधित ऊस पुरवठादारांना द्यावी, असेही आदेशात पुढे म्हटले आहे.

या कारखान्यांनी थकविली रक्कम
श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी (कोल्हापूर) या कारखान्याने 115 कोटी 92 लाख 13 हजार रुपये, रेणुका शुगर्स संचलित देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी (कोल्हापूर) या कारखान्याने 62 कोटी 32 लाख 59 हजार रुपये, श्री भोगावती सहकारी (कोल्हापूर) 51 कोटी 63 लाख 61 हजार रुपये आणि महाकाली सहकारी (सांगली) 23 कोटी 3 लाख 42 हजार रुपये तर माणगंगा सहकारी (सांगली) या कारखान्याने 11 कोटी 19 लाख 15 हजार रुपये इतकी एफआरपी दराप्रमाणे रक्कम थकित ठेवल्याचे याबाबत काढण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे. एकूण 264 कोटी 10 लाख 90 हजार रुपये शेतकर्‍यांचे थकित ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्तालयाने आदेश दिले आहेत.