पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

0

अब तक 200 : भारतीय लष्कराची मोहीम
श्रीनगर : जम्मू-काश्मीर येथे गुरुवारी सैन्याला मोठे यश मिळाले आहे. बडगाम आणि योपोर येथे झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश मिळाले आहे. यासोबतच या पूर्ण एक वर्षात जम्मू काश्मीर येथे 200 हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत.

भारतीय सैन्याला मिळालेल्या माहितीनुसार, बडगाम आणि सोपोर येथे दहशतवादी लपले होते. ’डबल ऑपरेशन’च्या अंतर्गत भारतीय सैन्याने या दहशतवाद्यांना शोधून काढले तसेच कंठस्नानदेखील घातले. आजचे हे यश भारतीय सैन्यासाठी खूप मोठे यश असल्याचे लष्कराने सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीर येथे सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांकडे भारतीय सैन्याचे बारीक लक्ष आहे. गुरुवारीदेखील भारतीय सैन्याचे जवान दहशतवादी लपलेल्या ठिकाणी पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. या गोळीबाराला भारतीय सैन्यानेदेखील चोख प्रत्युत्तर दिले. तसेच बराच काळ सुरु असलेल्या या गोळीबारानंतर अखेर जवानांनी दहशतवाद्यांना ठार केले.