पाच वर्षांपासून बंद तलाव तोडण्याचा निर्णय

0

पुणे : महापालिकेकडून तब्बल 3 कोटी रुपये खर्चून पर्वती पायथ्याजवळ उभारलेल्या जलतरण तलाव गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे. हा तलाव तोडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून त्या ठिकाणी समान पाणी योजनेसाठीची पाण्याची टाकी उभारली जाणार आहे. त्यासाठीच्या प्रशासकीय मान्यतांची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.

महापालिकेकडून पर्वती पायथा येथे हा जलतरण तलाव बांधण्यात आला आहे. त्याचे काम 2013 मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर अद्यापही पालिकेकडून तलावाचा वापर सुरू केलेला नाही, अथवा तो चालविण्यासाठीही देण्यात आलेला नाही. 2013 मध्येच या भागाचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी या तलावाच्या वापरासाठी आग्रह धरून प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया राबवून घेतली होती. मात्र, त्यानंतर निर्माण झालेल्या वादामुळे पुन्हा या तलावाबाबत काहीच झालेले नाही. तसेच या तलावाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून प्रशासनाकडून त्याच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केला जात आहे. असे असतानाच या तलावाच्या जागी आता समान पाणी योजनेची पाण्याची टाकी प्रस्तावित केली आहे. या टाकीसाठी आसपासच्या परिसरात प्रशासनास आवश्यक असलेली जागा उपलब्ध नसल्याने प्रशासनाने आता या तलावावरच हातोडा फिरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक असलेला प्रशासकीय प्रस्ताव तयार करून तो मान्यतेचे प्रक्रियेत आहे. मात्र, या प्रकारामुळे महापालिकेच्या चुकीच्या नियोजनामुळे पुणेकरांच्या कोट्यवधी रुपयांचा एका झटक्यात चुराडा होत असल्याचे समोर आले आहे.

एक टाकी वापराविना पडून

महापालिका प्रशासनाने याच जलतरण तलावाच्या शेजारी पूर्वी एक पाण्याची टाकी बांधलेली आहे.40 ते 50 लाख लीटर क्षमतेची ही टाकी असून त्याचा काहीच वापर सुरू नाही. या पूर्वीही अनेकदा स्थानिक नगरसेवकांकडून प्रशासनास या टाकीचा वापर सुरू करण्याची मागणी केली आहे.