पाच वर्षीय चिमुकल्याचा गळा आवळल्यानंतर विवाहितेची आत्महत्या
शिरूड गावातील दुर्दैवी घटना : मयत विवाहितेविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा
अमळनेर : आमच्या मृत्यूला कुणालाही जवाबदार धरू नका, नंदुरबारच्या सासरच्या मंडळींना बोलावू नका, अशा आशयाचा मजकुराची सुसाईड नोट लिहित अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील 31 वर्षीय विवाहितेने पाच वर्षांच्या चिमुकल्याचा गळा आवळत स्वतःदेखील आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, ही विवाहिता गेल्या काही वर्षांपासून शिरूड येथे माहेरी आपल्या आई-वडिलांसोबत वास्तव्यास होती. पूर्वी सोनवणे (31) असे मृत विवाहितेचे तर वृषांत (5) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
मृत्यूपूर्वी लिहिली चिठ्ठी
पूर्वी वसंतराव पाटील या विवाहितेचा विवाह काही वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यात झाला होता मात्र कौटुंबिक कारणातील वादानंतर ही महिला माहेरी आई-वडिलांकडेच शिरूडला वास्तव्यास होती. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास विवाहितेने पाच वर्षीय मुलाचा हाताने गळा आवळत खून केला व नंतर स्वतःदेखील आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी पूर्वी हिने इंग्रजीतून चिट्ठी लिहिली असून त्यास आपल्या मृत्यूस कोणासही जबाबदार धरू नये, आम्ही दोघे मायलेक जीवन संपवत आहोत, नंदुरबार येथील सासरच्या मंडळीला बोलावू नका, असेही चिठ्ठीत नमूद केले आहे. घटनेची माहिती कळताच अमळनेर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गंभीर शिंदे व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.