मांडवगण फराटा : येथील शेतकर्यांनी लघू पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेलार, निंबाळकर, गायकवाड यांना बंधार्यावर प्लेटा बसविण्याची विनंती केली होती. त्यानुसार लघू पाटबंधारे विभागाने तात्काळ प्लेटा उपलब्ध करुन दिल्या. यावेळी बाळासाहेब(काका) फराटे, आत्माराम बाप्पू फराटे, संभाजी आप्पा फराटे, संभाजी नाना फराटे, प्रभाकर घाडगे हे उपस्थित होते. ठेकेदार मिठे यांनी प्लेटा बसविण्याचे काम सुरू केले आहे. बंधार्याला 104 मोर्या असून सरासरी 8 प्लेटा या प्रमाणात एकूण 832 प्लेटा या बंधारा अडविण्यासाठी आवश्यक आहेत. यातील निम्या प्लेटस् गंजून गेल्या होत्या. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरात अतिशय भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. भीमा नदी कोरडी पडल्याने शेतकरी पावसाची वाट पाहून थकला आहे. काही दिवसांपूर्वी मांडवगण फराटा येथील शेतकर्यांनी भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, पाणी काही केल्या न सोडल्याने पिकांची परिस्थिती बिकट झाली होती.
फायबरच्या प्लेटस् बसविण्याची गरज…
गेल्या वर्षी 240 आणि यंदा 65 अशा एकूण 300 प्लेटस् बदलून नवीन टाकण्यात आल्या आहेत. अजूनही जवळपास 500 प्लेटस् बदलण्याची आवश्यकता आहे. प्रदुषित पाण्यामुळे लोखंडी प्लेटा लगेच गंज पकडतात आणि गळती सुरु होते. नेहमीच प्लेटा बदलण्याची गरज पडते. फायबरच्या प्लेट्स बसविण्यात आल्या तर त्या गंजणार नाहीत तसेच वारंवार बदलण्याची वेळ येणार नाही, असे अनेक शेतकर्यांनी बोलून दाखविले. हे काम खर्चीक असले तरी दीर्घकाळ टिकणारे असल्याने शासनाने याचा विचार करावा, असे मत शेतकर्यांनी व्यक्त केले.पाणी अडविण्यासाठी प्लेटा लवकर बसविण्याचा निर्णय घेतल्याने दुष्काळी परिस्थितीत पाणीप्रश्न काही प्रमाणात कमी होईल, अशी भावना शेतकर्यांनी व्यक्त केली.