पाटबंधार्‍याला हवे 30 कोटींचे भुईभाडे

0

पुणे । पुणेकरांना जादा पाणी दिल्यास पाणीपट्टीवर वाढीव दंड आकारण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने काही दिवसांपूर्वी दिला होता. आता पालिकेकडे जलवाहिनीच्या भुईभाड्यापोटी तब्बल 30 कोटींची मागणी केली आहे. खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंत कालव्याच्या बाजूने महापालिकेने 2 बंद जलवाहिन्या टाकल्या आहेत. त्याचे भाडे म्हणून पाटबंधारेने ही रक्कम मागितल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. धरणसाखळीतील वरसगाव, टेमघर, पानशेत तसेच खडकवासला धरणातून शहरास पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी पाटबंधारे विभाग आणि महापालिकेत करार झालेला आहे. असे असूनही भुईभाडे मागितल्याने पालिका पेचात पडली आहे.

लष्कर जलकेंद्रासाठी उघड्या कालव्यातूनच पाणी
1997 पर्यंत पालिकेकडून खडकवासला कालव्यातून हे पाणी घेतले जात होते. तेथून ते पर्वती जलकेंद्रांपर्यंत सुमारे 12 किलोमीटर अंतराचा हा कालवा आहे. मात्र, कालव्यास मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने पालिकेस पुरेसे पाणी मिळत नाही. तसेच पाणी वाया जात असल्याने पालिकेने 1997 मध्ये पहिली बंद जलवाहिनी टाकली. ती सुमारे 2500 मिमी व्यासाची आहे. त्यानंतर त्या शेजारी दुसरी जलवाहिनी टाकली. तिचे काम 2015-16 मध्ये पूर्ण झाले असून ती 3 हजार मिमी व्यासाची आहे. त्यमुळे पालिका आता पर्वती जलकेंद्रासाठी पूर्णपणे बंद जलवाहिनीमधूनच पाणी घेते. मात्र, लष्कर जलकेंद्रासाठी अजूनही पालिकेस उघड्या कालव्यातूनच पाणी घ्यावे लागते.

…म्हणून मागितले भुईभाडे
यापूर्वी पालिका बंद जलवाहिनीद्वारे पाणी घेत नसल्याने कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे सांगत पाटबंधारे विभागाने पालिकेकडून कालवा दुरूस्त करून देण्याची मागणी केली जात होती. तर आता पालिकेने बंद जलवाहिनीतून पाणी घेण्यास सुरुवात करताच पाटबंधारे विभागाने या जलवाहिनीच्या जागेपोटी 30 कोटींच्या भुईभाड्याची मागणी करत पालिकेला आणखी एकदा डिवचले आहे.

पालिका उत्पन्नाचा स्रोत?
गेल्या एक ते दोन वर्षात पाटबंधारे विभाग महापालिकेकडे उत्पन्नाचा स्रोत म्हणून पाहत असल्याचे दिसून येत आहे. शहरातून जाणार्‍या कालव्याचे पाणी महापालिकेस लागत असल्याने या कालव्याची गळती दूर करण्यासाठी पालिकेने निधी देण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे. त्यानंतर महापालिका आणि पर्यायाने पुणेकरांना देण्यात येणार्‍या पाण्याचे दर वाढविण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने नुकताच घेतलेला आहे. त्यानंतर पुणेकरांना जादा पाणी दिल्यास पालिकेवर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्याचे पत्र पालिकेस पाठवून दोन आठवडे झालेले असतानाच, आता भुईभाड्यापोटी 30 कोटींची मागणी पालिकेकडे करण्यात आली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून महापालिकेकडे उत्पन्नाचा स्रोत म्हणून पाहिले जात असल्याचे प्रशासकीय वर्तुळात बोलले जात आहे.

2015-16 साठी 14 कोटी
पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार, 1997 मध्ये टाकलेल्या जलवाहिनीच्या भुईभाड्यापोटी 16 कोटी, तर 2015-16 मध्ये टाकलेल्या जलवाहिनीच्या भाड्यापोटी सुमारे 14 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात पाटबंधारे विभागाकडून पहिल्यांदाच अशा प्रकारे मागणी करण्यात आल्याने पालिका प्रशासनासही संभ्रमात पडले आहे. याबाबत पाटबंधारे विभागाशी चर्चा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.