जळगाव । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील दलितमित्र डॉ.व्ही.आर.पाटील यांनी सपत्नीक देहदान करण्याचा संकल्प केला आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील दलितमित्र पुरस्काराने सन्मानित असलेले डॉ.व्ही.आर.पाटील श्रीराम ज्येष्ठ नागरीक मंडळाच्या माध्यमातुन वैद्यकीय सेवेबरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. लहानांपासुन ते ज्येष्ठांपर्यंतच्या सर्वच उपक्रमात डॉ.व्ही.आर.पाटील आणि त्यांच्या पत्नी सिंधुताई पाटील यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहीला आहे.
विद्यार्थी हित लक्षात घेऊन कार्य
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाळधी गावात ग्रामस्वच्छता अभियान, महिला बचत गटांना प्रोत्साहन, व्यक्तीमत्व विकास शिबीरे, जल, जमीन, जंगल, राष्ट्रीय संपत्ती या विषयांवर जनजागृती,वस्तीविकास योजना असे उपक्रम नित्यनेमाने सुरू आहेत. या सर्व उपक्रमांमध्ये समाजासाठी आदर्श ठरणारे देहदान हे पुण्यकर्म करण्याचा संकल्पही दलितमित्र डॉ. व्ही.आर.पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. सिंधुताई पाटील या दोघांनी केला आहे. देहदानाबाबत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात याविषयीची प्रक्रियादेखिल त्यांनी पुर्ण केली असुन विद्यार्थी हित लक्षात घेऊन डॉ. पाटील दाम्पत्याने समाजासमोर एक मोठा आदर्श घालुन दिला आहे.