पाणीकपात म्हणजे पुणेकरांची फसवणूक!

0

पुणे : खोटी आश्‍वासने देऊन पुणे महापालिकेत एकहाती सत्ता भाजपने मिळविली असताना, पुण्याच्या पाण्यात तब्बल 6.50 टिएमसी कपात करण्याचा आदेश आणि 24 तास पाणीपुरवठयाच्या निविदेची जाहीरात एकाच दिवशी येणे हा योगायोग नाही. ही सर्व भाजपची बनवाबनवी असून 24 तास पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष व्हावे असा या मागील छुपा अजेंडा असल्याची टिका पालिकेचे विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांनी केली आहे.

हा लक्ष विचलित करण्याचा प्रकार
शहरात पिण्याच्या पाण्याची कपात करायची आणि दुसरीकडे 24 तास पाणीपुरवठा योजनेची निविदा काढायची हा लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे. असा आरोप करून विरोधी पक्षनेते चेतन तुपे पुढे म्हणाले, पुणे शहराची पाण्याची मागणी वाढत आहे, त्यातच हॉस्टेल, महाविद्यालये, बाजूच्या गावांना पाणी आणि 11 गावे नव्याने समावेश केली आहेत. हॉटेल औद्योगिक वसाहत व नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेता पुरेसे पाणी उपलब्ध असताना भाजप सत्ताधारी शहराची पाणी कपात करत आहेत.

पालकमंत्र्यांना माहीत नसेल तर पुणेकरांचे दुर्देव
गल्ली ते दिल्ली भाजप सत्ता आहे, पालकमंत्री गिरीश बापट कालवा समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अखत्यारीत बैठका होत असताना पाणी कपात आम्हाला माहीत नाही हा दावा खोटा आहे. जर पालकमंत्र्यांना माहीत नसेल तर पुणेकरांचे दुर्देव आहे. हा पूर्वनियोजित कट असून 247 पाणीपुरवठा यात भाजपचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार आहे निविदेवर सही होत असताना अहवाल बाहेर येतो हा योगायोग नाही हे सर्व पूर्वनियोजित घडवून आणले जाते आहे. स्वतःची पोळी भाजून घेण्याचे किळसवाणे राजकारण भाजप करीत आहेत. सत्तेची नशा चढली आहे, मतदार खिशात आहेत पुणेकर सोबत आहेत अशा अविर्भावात पुणेकरांच्या भावनेशी खेळण्याचा डाव आहे.

पाणीकपातीचा भाजपचा डाव हाणून पडणार
कोट्यवधींचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी पाणीकपात करण्याचे षडयंत्र आम्ही हाणून पाडणार, पालिका हद्दीत सुरळीत पाणीपुरवठा करण्याबरोबर नव्याने सामाविष्ट गावांना पाणी द्यावे. पाणीकपात केल्यास सत्ताधारी भाजपच्या मनमानीविरोधात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा चेतन तुपे यांनी दिला आहे. दरम्यान, पाणीकपातीच्या वृत्ताने पुणेकरांमध्येही संतापाची लाट आहे.

साडेसहा टीएमसीपेक्षा अधिक कपात शक्य
शहरात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेचा डंका वाजत असताना महापालिकेला वार्षिक 8.19 टीएमसी पाणीपुरवठा करण्याच्या आदेश जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे यांनी दिला आहे. यामुळे सध्याच्या पाणीपुरवठ्यात तब्बल साडेसहा टीएमसीपेक्षाही अधिक कपात करावी लागणार आहे. शासनाने महापालिकेला 2021पर्यंत वार्षिक 11.50 टीएमसी पाणी मंजूर केले आहे. महापालिकेला वार्षिक 8.19 टीएमसीपर्यंत पाणीपुरवठा करण्याचा आदेश जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे यांनी दिला आहे. मुळात महापालिकेत आणि राज्यात भाजपचीच सत्ता असल्याने हे सर्व भाजपचेच कारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.