मुंबई। टंचाई घोषित न केल्यामुळे टँकर किंवा पर्यायी पाण्याची व्यवस्था करणे अवघड होत असल्याने जिल्हाधिकार्यांना टंचाई घोषित करण्याचे अधिकार दिले आहेत. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे या स्तरावरून टंचाईचा निर्णय घेणारे पहिले जिल्हाधिकारी असून त्यांनी ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत मुदत वाढविली आहे. महाराष्ट्र भूजल अधिनियम 2009 अंतर्गत आता जिल्ह्यातील स्थानिक पर्जन्यमान, पाण्याची पातळी पाहून आता जिल्हाधिकारी निर्णय घेऊ शकतात.
जळगाव जिल्ह्यात 34 गावांमध्ये पाणीटंचाई
खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील 34 गावांमध्ये पाणीटंचाई असल्याची अधिकृत माहिती मिळाली असून या गावांसाठी एकूण 18 टँकर सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली आहे. गेल्या वर्षी या काळात एकही टँकर सुरू नसलेल्या जळगाव जिल्ह्यात यावर्षी मात्र हलाखीची स्थिती आहे. धुळे जिल्ह्यात 11 गावांमध्ये 8 टँकर सुरू आहेत. जलसंपदा मंत्री पालक असलेल्या नाशिक जिल्ह्यात 14 गावे व 13 वाड्यांवर ग3 टँकर सुरू आहेत.
तर राज्यात स्थिती अजून बिकट होणार
राज्यात सर्वाधिक गावे ही पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात असून तिथे 131 गावे व 897 वाड्यांवर 139 टँकर सुरू आहेत. एकूण राज्यभरात 527 गावांमध्ये, 1690 वाड्यांमध्ये 484 टँकर सुरू असल्याची माहिती विभागाकडून मिळाली आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा पर्जन्यमान कमी असल्याने स्थिती बिकट झाल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी 112 गावे, 661 वाड्या 137 टँकर सुरू होते. सध्या पावसाची चिन्हे दिसत नसून येत्या काही दिवसात पाऊस न आल्यास पाणीटंचाई भीषण होऊ शकते.