भाजप शहराध्यक्ष आमदार जगताप यांनी केली मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीसाठी 18 कोटी 45 लाख रुपये खर्च करत आहे. शहरातील पाणीपुरवठ्यावर देखभाल दुरुस्तीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होतो. हे संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे देखभाल दुरुस्तीवर झालेल्या संपूर्ण खर्चाची चौकशी करावी. दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. एमआडीसीकडून पाणी घेण्याऐवजी जलसंपदा विभागाकडून थेट पाणी उचलावे, अशी मागणी सत्ताधारी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेकडे केली आहे. चौकशी करण्याच्या मागणीमुळे पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांचे मात्र धाबे दणाणले आहेत.
हा खर्च नियंत्रित करावा
या मागण्यांबाबत आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवदेनाद्वारे या मागण्या केल्या आहेत. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीसाठी 18 कोटी 45 लाख रुपये खर्च करीत असल्याचे समजते. शहरातील पाणीपुरवठ्यावर देखभाल दुरुस्तीसाठी 18 कोटी रुपये खर्च होतो, हे संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे या देखभाल दुरुस्तीवर झालेल्या खर्चाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. यामध्ये दोषी आढळणार्या अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी. त्याचबरोबर आगामी काळात पाणीपुरवठा विभागातील देखभाल दुरुस्ती खर्चाच्या बाबींचा विचार करता हाखर्च नियंत्रित करण्यात यावा.
जलसंपदा विभागाकडून पाणी घ्यावे
महापालिका 470 एमएलडी अशुद्ध पाणी उचलण्यासाठी जलसंपदा विभागास 11.38 कोटी रुपये अदा करते. तर, एमआयडीसीकडून 30 एमएलडी उचलण्यासाठी पालिका 9.23 कोटी खर्च करीत आहे. त्यानुसार जलसंपादाचे पाण्यासाठी पालिका 2.42 लाख रुपये प्रत्येक एमएलडीसाठी अदा करत आहे. तर, एमआयडीसीकडून येणार्या पाण्यासाठी 31.26 लाख रुपये प्रत्येक एमएलडीसाठी अदा करीत आहे. त्यामुळे पालिकेने एमआयडीसी ऐवजी जलसंपादाकडून पाणी उचलावे. त्यामुळे पालिकेचे 8.50 कोटी रुपयांची बचत होईल. त्यासाठी यावर आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी निवेदनातून केली आहे.