पाणीपुरवठा सुरळित करण्याची शिवसेनेची मागणी

0

रूपीनगरमध्ये अनियमित पाणीपुरवठा

सांगवी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक बारामधील रुपीनगर, तळवडे आदी भागात सुरळीत व योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या युवराज कोकाटे, सुखदेव नरळे यांनी केली आहे. प्रभाग क्रमांक बारामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. विशेष करून या परिसरातील महिलांना ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत येथील स्थानिकांनी महापालिका ‘फ’ प्रभाग कार्यालय पाणीपुरवठा विभाग अधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

कर्मचार्‍यांची मनमानी देखील सुरू
याबाबत महापालिकेला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्यास, तसेच योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी केल्यास संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत आहे. या भागातील पाईप लाईन जुनी झाली आहे. गंजली आहे. त्यामुळे नवीन नळ कनेक्शन घ्या, असा तगदा महापालिका अधिकारी, कर्मचारी लावत आहेत. परंतू, नवीन कनेक्शन सर्वसामान्य नागरीकांना न परवडणारे आहे. अधिकारी, कर्मचार्‍यांची मनमानी देखील सुरू आहे. या सर्व समस्यांचा विचार करता पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांवर कडक कारवाई करावी. प्रभाग क्रमांक बारामध्ये सुरळीत, योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यात यावा.