भुसावळ : शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळेतच वीज भारनियमन वाढल्याने आठवड्याआड होणार्या पाणीपुरवठ्यालाही नागरीक मुकले आहेत. यामुळे पाणीपुरवठा व वीज भारनियमन यांच्या वेळापत्रकाचा ताळमेळ बसवावा व पाणीपुरवठा होणार्या काळात भारनियमन करू नये, अशी मागणी माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी महावितरणकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत त्यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे यांना निवेदनही दिले.
पाण्याअभावी शहरवासीयांचे हाल
शहरात महावितरणकडून भारनियमन सुरू असून राज्यात विजेची मागणी वाढल्याने भारनियमनाला विरोध नाही मात्र यामुळे नागरीकांच्या तोंडचे पाणीही पळवले जात आहे. शहरातील पाणीपुरवठा योजना जीर्ण व कालबाह्य आहे. 40 वर्ष जुन्या या योजनेतून दिवसाला केवळ 40 ते 50 हजार नागरिकांना पुरवठा होऊ शकतो. तर शहराची लोकसंख्या अडीच लाखांवर आहे. सध्या श्रीरामनगर, सोनिच्छावाडी, गणेशपुरी, चमेली नगर, कोंडीवाडी अशा ठिकाणी सकाळी चार वाजेचा पाण्याचा वेळ आहे. मात्र याच दरम्यान वीजपुरवठा खंडीत होतो. याचप्रमाणे 50 टक्के भुसावळ शहरात हाच प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपुरवठ्याच्या काळात वीजपुरवठा खंडीत असला तर नागरिकांना पाणी भरता येत नाही. पाणी न मिळाल्यास पून्हा आठवड्याने पाणी मिळेल, अर्थात 16 दिवसांआड पाणीपुरवठा होईल. पालिका प्रशासन रोटेशन बदलू शकत नाही, यामुळे महावितरणने ताळमेळ साधून भारनियमाची वेळ निश्चित करावी, अशी मागणीही माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी केली आहे.