ठाणे । मुंब्रा -कौसा भागाला 10 एमएलडी अतिरिक्त पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र, हे पाणी दिले जात नसतानाच आता पाणीकपातही केली जात आहे. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कळवा- मुंब्रा विभागाचे अध्यक्ष तथा नगरसेवक अश्रफ (शानू) पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथे मोर्चा काढण्यात आला होता. मुंब्रा आणि कौसा परिसरात सध्या पाण्याची मोठी टंचाई भेडसावत आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी पालिकेने मुंब्रा भागाला 10 दशलक्ष लहटर पाणी अतिरिक्त स्वरुपात देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्यापही या पाण्याचा पुरवठा करण्यात आलेला नाही. येथे पाणी कपात जोरदार स्वरूपात सुरू आहे. पाण्याचे बिल थकले असल्याचा कांगावा करीत पाणी मीटर कापण्याचेही प्रकार केले जात आहेत, तर कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिक मोटारीचा वापर करीत आहेत.
अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
मोटार विज खात्याचे कर्मचारी पंचनामा न करताच जप्त करत आहेत; पालिका आणि महावितरण कडून मुंब्रावासीयांवर अप्रत्यक्ष अन्यायच केला जात असल्याचा आरोप करून शानू पठाण यांनी आ. जितेंद्र आव्हाड, सय्यद अली अश्रफ, आनंद परांजपे, यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चाचे आयोजन केले होते. भागात अमली पदार्थांची मोठी विक्री केली जात आहे. या अमली पदार्थांच्या विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही या मोर्चामध्ये करण्यात आली. अधिकार्यांना यासंदर्भात निवेदन दिले.