पुणे : गेल्या आठवड्यापासून पुणे शहरात पाणीप्रश्न चांगलाच गाजत आहे. याच मुद्द्यावरून आज महापालिकेत गदारोळ करण्यात आला आहे. शहरातील सर्व भागात विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे संतप्त झालेले भाजप वगळता इतर पक्षांचे नगरसेवक हंडे घेवून महापालिकेत आले. यावेळी नगरसेवकांनी थेट हंडे-कलशा घेत महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोरच ठाण मांडत मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील केली.
कालवा समितीच्या बैठकीत पुणे महापालिकेला देण्यात आलेल्या दररोजच्या पाण्याचे प्रमाण वाढत्या शहरीकरणामुळे पुरेसे नाही. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक पाणी उचलते.यंदा प्रथमच पाटबंधारे विभागाने या प्रकाराला चाप लावत चक्क महापालिकेच्या पाण्याचे पंप पोलिसांच्या उपस्थितीत बंद केले. अर्थात महापालिकेला या प्रकारची कोणतीही कल्पना देण्यात आली नसल्याने ऐन नवरात्रीत शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा खंडित झाला होता.याच विषयावर मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने आंदोलन केले.
यावेळी नगरसेवकांनी थेट हंडे-कळशा घेत महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोरच ठाण मांडला.या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्यासह नगरसेवक सहभागी झाल्याचे बघायला मिळाले.