पुणे : शेतीसाठी खडकवासला धरणातून आवर्तन सुरू होणार असून, शहरावर पाणीकपातीचे संकट अधिक वाढले आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या धरणांमध्ये साडेदहा टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. कालवा समितीच्या निर्णयानुसार उन्हाळी आवर्तन शेतीला द्यावे लागणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून पाण्याची मागणी वाढू शकते. यामध्ये पुणे शहरावर पाणी कपातीचे संकट मे महिन्यात उभे राहणार असून, पाणीकपात कधीही लागू केली जाऊ शकते. कालवा समितीमध्ये निर्णय झाल्यानुसार आता शेतीला उन्हाळी आवर्तन द्यावेच लागणार आहे. यामध्ये दोन शेतकर्यांनी पुणे शहराचा पाणी वापर जास्त असून शेतीला पाणी देण्यात यावे अशी याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आहे.
उपल्बध पाणीसाठ्यावर पुढील नियोजन
शेतीचे पाणी कमी करता येणार नाही. उन्हाळी आवर्तनासाठी शेतीला चार टीएमसी पाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाणी योजना यांच्यासाठी पाणी द्यावे लागणार आहे. त्यामुळे पाच टीएमसी पाणी यासाठी आवश्यक आहे. दरम्यान, एक टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होते. महापालिकेला 15 जुलैपर्यंत सात ते साडेसात टीएमसी पाणी आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याचा वापर वाढत असल्यामुळे पाण्याची मागणीदेखील वाढत असते. त्यामुळे पुण्यावर पाणी संकट उभे राहण्याची शक्यता आहे. पावसाळ्यामध्ये शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे शंभर टक्के भरली होती. मात्र, परतीचा पाऊस समाधानकारक झाला नसल्यामुळे धरणांमध्ये दोन ते तीन टीएमसी पाणीसाठा कमी झाला. यामध्येच टेमघर धरणाची दुरुस्ती करावी लागणार असल्यामुळे हे धरण पूर्ण रिकामे करण्यात आले आहे. त्यामुळे आता उपलब्ध पाणी साठ्यावर महापालिकेला पुढील पाच महिन्यांचे नियोजन करावे लागणार आहे.