पाणी कपात, हेल्मेट सक्तीबाबत भाजपचे एक पाऊल मागे !

0

पुणे : लोकसभेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार एकेक पाऊल पुढे टाकत असतानाच पुण्यात मात्र पाणी कपात, हेल्मेटसक्ती अशा कारणाने जनमत पक्षाच्या विरोधात जात होते. पुण्यातील बदलत्या वातावरणाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि पुणेकरांना दिलासा दिला. भाजपची कोंडी सोडविली.

नववर्ष प्रारंभापासून पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती लागू केली. हेल्मेट नसल्यास पाचशे रुपये दंड आकारणी चालू केली. पुण्यासारख्या छोटे रस्ते आणि जास्तवाहनांची संख्या यामुळे वाहनांनी गती २० किमीपेक्षा जास्त नसते आणि आजारी, वयस्कर व्यक्तिंना गैरसोयीचे असल्याने हेल्मेट वापर व्यवहार्य नाही अशी बाजू हेल्मेटविरोधी कृती समितीने मांडली. खासदार अनिल शिरोळे यांनी सुध्दा सक्ती विरोधात भूमिका घेतली. त्यानंतरही पोलीस खात्याने कारवाई चालू ठेवली. खासदारालाही पोलीस अधिकारी जुमानत नाही हे पाहिल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे , शिवसेना या पक्षांनी एकवटून हेल्मेट विरोधी आंदोलन चालू केले. पोलीस खात्याने सुमारे दहा हजार वाहनचालकांना अडवून एक कोटी रुपये वसूल केले, शिवाय सीसीटीव्हीची मदत घेऊन हजारो नोटीसा पाठविल्या . पोलीस आयुक्तांच्या या कारवाईने पुण्याच्या पालकमंत्र्यांविरोधात संताप पसरला. त्यातच महापौर मुक्ता टिळक, ना.बापट, जलसंपदा खात्याचे अधिकारी यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे पाणी कपात लागू होणार , पुण्याचे हक्काचे पाणी भाजप सोडून देणार असे वातावरण तयार झाले. काँग्रेसने संधीचा फायदा उठविला रमेश बागवे, मोहन जोशी, अनंत गाडगीळ यांनी आंदोलने केली.

या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचा पुणे दौरा झाला. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बदलते वातावरण त्यांच्या कानी घातले. निवडणुकीत प्रतिक्रिया उमटू शकते असे लक्षात आल्यावर पाणी कपात तूर्तास नाही आणि हेल्मेट सक्ती सबुरीने घ्या असे धोरण फडणवीस यांनी संबंधितांना सांगून टाकले. पुणेकरांनी आणि भाजप नेत्यांनी आता सुटकेचा निश्वास टाकला. दबाव निर्माण करण्यात भाजप विरोधी पक्ष, स्वयंसेवी संघटना आणि पुणेकर यशस्वी ठरले.